पुणे महापालिकाच दररोज नदीत सोडते साडेचारशे एमएलडी सांडपाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 12:28 PM2022-09-22T12:28:41+5:302022-09-22T12:28:57+5:30
प्रक्रिया करणाऱ्या प्लांटची कमतरता : जायका प्रकल्पातील केंद्रांसाठी वाट पाहावी लागणार
श्रीकिशन काळे
पुणे : शहरात दररोज ८८९ एमएलडी सांडपाणी तयार होत आहे. यामधील केवळ ४५० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाते, इतर ४३९ एमएलडी सांडपाणी थेट नदीत सोडले जात आहे. त्यामुळेच नदीची गटारगंगा झाली आहे. हेच पाणी पुढे उजनीकडे जाते आणि तेथील शेतीवर, जनावरांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. लवकरात लवकर सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया केली, तरच नदी स्वच्छ पाण्याला घेऊन प्रवाही राहणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरात नदीचे प्रदूषण ही मोठी गंभीर समस्या बनली आहे. मुठा नदीत दररोज कित्येक एमएलडी सांडपाणी आणि कचरा टाकला जात आहे. अनेक ठिकाणी रसायनमिश्रित पाणी नदीत जात असून, ते पुढे भीमा नदीत मिसळत आहे. ज्याचे परिणाम उजनी धरणात बघायला मिळत आहेत. हे रोखण्यासाठी पुणे शहरात निर्माण होणाऱ्या सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते नदीत सोडले जाणे आवश्यक आहे; परंतु त्याकडे महापालिका दुर्लक्ष करत आहे.
पुणे शहर खूप वेगाने विस्तारत असून, त्याप्रमाणात पाण्याची मागणी वाढत आहे. आता मुबलक पाणी मिळत असले, तरी भविष्यात टंचाई निर्माण होऊ शकते. येत्या काही वर्षांत पुण्याची लोकसंख्या प्रचंड वाढेल आणि त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
आणखी २३ गावांचे सांडपाणी वाढणार
शहरात दररोज ७५० एमएलडी व अकरा गावांतील १३९ एमएलडी सांडपाणी तयार होते. त्यात आता २३ गावांचा समावेश पुण्यात झाला आहे. त्यामुळे त्यांचे सांडपाणी अद्याप किती निर्माण होते, त्याची आकडेवारी आलेली नाही. एकूणच पुण्याचा वाढता विस्तार पाहता सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे केंद्र वाढविणे हेच आवश्यक आहे.
मार्च २०२५ मध्ये हे प्लांट सुरू होतील
जायका प्रकल्पांतर्गत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ११ एसटीपी प्लांट तयार करण्यात येत आहे. हे काम तीन वर्षे चालणार असून, मार्च २०२५ मध्ये हे प्लांट सुरू होतील. त्यातून ३९६ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करता येणार आहे. - जगदीश खानोरे, जायका प्रकल्प, महापालिका
दररोज ७५० एमएलडी पुणे शहरात सांडपाणी निर्माण होते
दररोज ७५० एमएलडी पुणे शहरात सांडपाणी निर्माण होते. त्यापैकी ४५० वर प्रक्रिया केली जाते. सध्या १० प्लांटमध्ये हे काम सुरू आहे. त्यातील नायडू रुग्णालयातील जुना प्लांट पाडण्यात येत आहे. त्यामुळे तेथील पाणी नव्या नायडूच्या प्लांटमध्ये वळविण्यात आले आहे. - प्रमोद उंडे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका
नदीत सांडपाण्यातून पेस्टीसाइड्स, हेवी मेटल्स
दररोज ४३९ एमएलडी सांडपाणी थेट नदीत जात आहे. त्यामुळे नदी प्रदूषित बनली असून, त्याचा परिणाम पुढील गावांवर व उजनी धरणावर होत आहे. नदीत पेस्टीसाइड्स व हेवी मेटल्स जात आहेत. त्याचा भयंकर परिणाम होतो. जनावरे पाणी पीत असतील, तर ती घातक रसायने त्यांच्या दुधाद्वारे आपल्या पोटात जातात. त्यामुळे आपल्याला अनेक आजार होऊ शकतात. त्वचारोग, केस गळणे, गर्भावर परिणाम होणे आदी आजारांचे प्रमाण वाढते. - डाॅ. प्रमोद मोघे, माजी शास्त्रज्ञ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा
उपाय काय ?
- दररोज सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया करून नदीत सोडणे.
- नागरिकांनी पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारणे.
- नदीत कचरा टाकणे बंद करणे.