शाळेबरोबर आता पावसाची सुट्टी संपली; राज्यात जोरदार सुरु, जुलै महिन्यात चांगलाच बरसणार
By श्रीकिशन काळे | Published: July 2, 2024 04:36 PM2024-07-02T16:36:03+5:302024-07-02T16:37:02+5:30
राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात जुलै महिन्यात त्या महिन्यातील सरासरीइतका म्हणजे ९६ ते १०४% इतका पाऊस पडण्याची शक्यता
पुणे : मॉन्सूनने संपूर्ण भारत मंगळवारी (दि.२) व्यापला. नेहमीपेक्षा ६ दिवस अगोदरच मॉन्सूने देश व्यापला असून, राज्यात जोरदार पावसालाही सुरवात झाली. जून महिन्यामध्ये पावसाने ओढ दिली, पण आता जुलै महिन्यात चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तसेच या महिन्यात समाधानकारक पाऊस असेल, अशी माहिती सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
संपूर्ण देशामध्ये लेह-लडाख व पूर्व तमिळनाडू व पूर्वोत्तर ७ राज्ये वगळता जुलै महिन्यात सरासरी पडणाऱ्या पावसाच्या १०६% पेक्षा अधिक पाऊस अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरी पेक्षा कमी पावसाची शक्यता नाही.
महाराष्ट्रातील मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, उत्तर रत्नागिरी, नंदुरबार, नाशिक, धुळे, नगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, पश्चिम सातारा, पूर्व सोलापूर, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर ह्या जिल्ह्यात जुलै महिन्यात त्या महिन्यातील सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०६% इतक्या पावसाची शक्यता जाणवते. दक्षिण रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या फलटण, माण, खटाव, माळशिरस, पंढरपूर तालुक्याच्या भागात जुलै महिन्यात त्या महिन्यातील सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०६% किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची शक्यता अधिक जाणवते. जळगांव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, बुलढाणा, यवतमाळ व ह्या जिल्ह्यात व जिल्ह्यांच्या लगतच्या परिसरात जुलै महिन्यात त्या महिन्यातील सरासरीइतका म्हणजे ९६ ते १०४% इतका पाऊस पडण्याची शक्यता जाणवते.
'ला- निना' सक्रिय होणार
ऑगस्ट महिन्यात 'ला-निना’ डोकावणार आहे. त्यामुळे जुलै महिन्यातील पावसासाठी समुद्र पृष्ठभागीय पाणी तापमान म्हणजेच तटस्थेतील एन्सो स्थिती पूरकच समजावी लागणार आहे.
मान्सूनने मंगळवारी (दि.२) संपूर्ण देश वेळेआधी म्हणजे ६ दिवस अगोदर काबीज केला. ‘मान्सून ट्रफ’ स्थापित झाला असून, सरासरी जागेपासून अधिक उत्तरेला आहे. मॉन्सून ट्रफ म्हणजे पाकिस्तानपासून ते बंगालच्या खाडीपर्यंतचा कमी दाबाचा पट्टा. गुजरात भुभाग व दक्षिण किनारपट्टीवर चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. पुढील ३ दिवस कोकण, विदर्भात जोरदार तर मध्य महाराष्ट्रात मध्यम तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. - माणिकराव खुळे, सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ