ताणतणाव, चिडचिडेपणा, नैराश्य मानसिक आजारांचं प्रमाण वाढतंय; तरुणाईमध्ये प्रमाण अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 02:05 PM2024-10-10T14:05:14+5:302024-10-10T14:05:33+5:30
सर्दी, ताप खोकला किंवा पोटदुखी झाल्यास डॉक्टरांकडे धाव घेतो. पण मानसिक आजाराचे काय? त्याकडे आपण दुर्लक्ष करतोय
पुणे : विविध ताणतणाव आणि वाढत चाललेली स्पर्धा यामुळे प्रत्येक व्यक्तीला मानसिक ताणतणाव, नैराश्य आणि चिडचिडेपणाला सामाेरे जावे लागत आहे. परिणामी मानसिक आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यात प्रामुख्याने प्रत्येक दहा व्यक्तींमागे दाेन व्यक्ती मानसिक आजाराची शिकार हाेत आहेत. तरुणामध्येही मानसिक आजाराचे प्रमाण वाढत असून, २०३० पर्यंत नैराश्यामुळे मोठ्या प्रमाणात मानसिक दुबळेपणा वाढण्याचा धोका असल्याचे जागतिक आराेग्य संघटनेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासातून निदर्शनास आले आहे.
शारीरिक आरोग्याइतकेच आज मानसिक आरोग्य सांभाळणे खूप आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार, राज्यात १४.३ टक्के म्हणजे २.६ कोटी प्रौढ लोक मानसिक आरोग्याशी झगडत असून, प्रत्येकी १० व्यक्तींपैकी किमान दोन व्यक्तींना मानसिक आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. कुणाला सर्दी, ताप खोकला किंवा पोटदुखी झाल्यास मागचा पुढचा विचार न करता डॉक्टरांकडे धाव घेतो. पण मानसिक आजाराचे काय? त्याकडे दुर्लक्ष करतो.
काय म्हणते राष्ट्रीय मानसिक आराेग्य सर्वेक्षण
- राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण २०१९ नुसार, देशातील १४ टक्के प्रौढ व्यक्तींमध्ये मानसिक आजाराची लक्षणे आहेत.
- सुमारे ५.६ कोटी लोक नैराश्याने आणि ३.८० कोटी लोक चिंतेने ग्रस्त आहेत. जागतिक स्तरावर आणि देशात मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. महाराष्ट्रही त्याला अपवाद ठरलेला नाही.
- मानसिक आजार योग्यवेळी निदान झाल्यास आजार बरे होण्याची शक्यता असते. पण पुरेशा मानसोपचार तज्ज्ञांच्या अभावी १५ कोटी मानसिक आजारी लोकांपैकी फक्त २५ टक्केच लोकांना उपचार मिळत असल्याचे राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षणातून समोर आले आहे.
- एक लाख लोकसंख्येमागे किमान १३ मानसिक आरोग्य कर्मचारी अपेक्षित असताना केवळ दोन मानसिक आरोग्य कर्मचारी व ०.३ मानसोपचार तज्ज्ञ उपलब्ध आहेत. ही परिस्थिती चिंताजनक आहे.
- यावरून मानसिक आरोग्याला शासकीय पातळीवरही दुर्लक्षित केले असल्याचेच दिसते. त्यामुळे मानसिक आरोग्याच्या सेवा घेण्यासाठी पुणे, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर या चार प्रादेशिक मनोरुग्णालयांवरच भिस्त आहे.
८५ टक्के लाेकांना दरमहा २ ते ३ हजारांचा मानसाेपचारावर खर्च
जवळच्या सरकारी रुग्णालयातून मानसोपचाराच्या सेवा मिळत नसल्यामुळे ८५% लोकांना दर महिन्याला २ ते ३ हजारांचा महिन्याला खर्च करून खासगी रुग्णालयातून उपचार घ्यावे लागतात. हा खर्च बऱ्याच लोकांना परवडणारा नसल्याने, उपचार अर्ध्यावरच सोडले जातात. नॅशनल सॅम्पल सव्र्हे २०१७-१८ च्या अहवालात, मानसोपचार व मेंदूविकारांसाठी सरकारी रुग्णालयात ७,२३५ रु., तर खासगी रुग्णालयात ४१,२३९ रु. खर्च होत असल्याचे समोर आले आहे.
मानसिक आरोग्य सेवांचे विकेंद्रीकरण हाेणे आवश्यक आहे. त्याचबराेबर स्थानिक किंवा जवळच्या रुग्णालयात प्राथमिक सुविधा मिळाली, तर मानसिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण ५० टक्क्याने कमी होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासात दिसून आले आहे. - विनोद शेंडे, आरोग्य हक्क कार्यकर्ते व सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक-संशोधक
आजामितीला दहापैकी किमान दोन व्यक्तींना मानसिक आरोग्याशी निगडित समस्या निर्माण झाल्या आहेत. यात प्रामुख्याने २५ ते ३५ वयोगटातील तरुणांचे प्रमाण अधिक आहे. कौटुंबिक जबाबदारी, नौकरी आणि आर्थिक ताणतणाव ही त्यामागील कारणे आहेत. लोकांमध्ये मानसोपचार तज्ज्ञांकडे येण्याचा कल वाढत आहे. लोकांमध्ये मानसिक आरोग्यविषयी जनजागृती होत आहे. - डॉ निकेत कासार, प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ
मानसिक आरोग्य उत्तम कसे ठेवाल?
* वाईट घटनांचा स्वीकार करणे.
* माझ्याबाबतीत हे का घडले? याचा विचार न करता परिस्थितीला सामोरे जाणे.
* सकारात्मक विचार करणे.
* कुटुंबाला जास्तीत जास्त प्राधान्य देणे.
* नव्या नव्या गोष्टी शिकण्यास प्राधान्य देणे.
* स्पर्धात्मक जीवनशैलीमध्ये देखील आनंदी राहाणे.
* आयुष्यात वास्तविकतेला धरून उद्दिष्ट्य निश्चित करणे.
मानसिक असंतुलनाची कारणे
* वाढत्या स्पर्धेतील ताणतणाव
* पती-पत्नीमधील वारंवार होणारे वादविवाद
* मोबाइलचा अतिवापर
* संयमाचा अभाव