गुंड शरद मोहोळच्या हत्येचे कारण आले समोर; 8 आरोपी गजाआड, शस्त्रसाठाही जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 11:10 PM2024-01-05T23:10:21+5:302024-01-05T23:12:50+5:30
शरद मोहोळ याचे आणि आरोपीचे जमिनीच्या आणि पैशाच्या वादातून भांडण झाले होते
किरण शिंदे
पुणे - कुख्यात गुंड शरद मोहोळ याची आज त्याच्या पुण्यातील राहत्या घरासमोरच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मारेकऱ्यांना पकडण्याचं मोठं आव्हान पुणे पोलिसांसमोर होतं. त्यानंतर पुणे पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात आता मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना ताब्यात घेतल आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिरवळ जवळून पाठलाग करत ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आता शरद मोहोळच्या हत्येचे कारणही समोर आले आहे.
शरद मोहोळ याचे आणि आरोपीचे जमिनीच्या आणि पैशाच्या वादातून भांडण झाले होते. आणि त्याच भांडणाच्या रागातून आरोपींनी त्याचा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात आता कोथरूड पोलीस ठाण्यात रजि क्रं 2/23 कलम 302,307,34 IPC सह भारतीय हत्यार कायदा कलम 3,25,महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1),(3)सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान शरद मोहोळचा खून केल्यानंतर आरोपी पसार झाले होते. पुणे शाखेच्या पोलिसांना तपासादरम्यान आरोपींची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेची 9 पथके पुणे शहराच्या परिसरात आणि पुणे ग्रामीण, सातारा व कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आली होती. त्या दरम्यान पुणे सातारा रोडवर किकवी - शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयित स्विफ्ट गाडीचा पाठलाग करून 8 आरोपी, 3 पिस्टल, 3 मॅगझीन, 5 राउंड व 2 चार चाकी गाड्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. ही कामगिरी पुणे शहर गुन्हे शाखेने कारवाई करून घटनास्थळी गोळीबार करणाऱ्या व त्यांना मदत करणाऱ्या आरोपीना ताब्यात घेण्यात आलेले आहे