Pune Ganpati: पत्रास कारण की.., पत्रसंवाद कमी झालाय! बाप्पासाठी साकारला डाकघराचा देखावा
By श्रीकिशन काळे | Published: September 12, 2024 04:56 PM2024-09-12T16:56:23+5:302024-09-12T16:57:24+5:30
पत्रसंवाद कमी होत असल्याने त्याविषयी देखाव्यातून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे
पुणे : पूर्वी आपल्या प्रियजनांना मनातील भावना किंवा एखादा संदेश द्यायचा असेल तर पत्र पाठविले जायचे. त्यासाठी टपाल विभाग अत्यंत महत्त्वाचे काम करायचा. पण आता आधुनिक क्रांतीमुळे प्रत्येकाच्या हातात मोबाइल आले आणि पत्र लिहिण्याची कलाही लोप पावू लागली. पण टपाल विभागाचे काम अजूनही कौतुकास्पद आहे. याच कामाचा गौरव करण्यासाठी योगेश ठीक यांनी आपल्या बाप्पासाठी डाकघराचा देखावा सादर केला आहे.
या विषयी योगेश ठीक म्हणाले, आई-बाबा तसे थकले असल्यामुळे गणपती येण्याअगोदर दोन आठवड्यात मी हा देखावा एकट्याने दिवस-रात्र एक करून साकारला. हे सगळं करत असताना रात्रीचे दोन आणि तीन सहज वाजत होते. खरं तर ‘बाप्पा’ हे सगळं आनंदाने करूनही घेत असतो म्हणा ! त्यात कलेच्या क्षेत्रात गेली अनेक वर्षे फोटोग्राफर आणि इतरही अनेक माध्यमांत काम करतोय. त्यामुळे नवीन संकल्पनेचा शोध आणि मागोसा घेणं कायमचं सुरूच असतं. हा देखावा पुण्यातील सर्वात जुनं डाक घर म्हणून इंटरनेटवर सर्च करत होतो. तेव्हा इंटरनेटवर जे फोटो मिळाले, त्यानुसार प्रथम संगणकावर चित्र काढून देखावा सुरू केला. हा संपूर्ण देखावा पुठ्ठ्यावर उभारलेला आहे, असे ठीक यांनी सांगितले.
यंदा डाकघराची संकल्पना साकारली. त्यामध्ये आमचे बाप्पा विराजमान झालेत. अनेकांना हा देखावा आवडला आहे. पत्रसंवाद कमी होत असल्याने त्याविषयी यातून संदेश देण्याचा प्रयत्न केला. आमच्या ‘डाकघरात’त म्हणजे देखावा पहायला येणाऱ्या प्रत्येकाला प्रसाद म्हणून पोस्टकार्ड देत आहोत. - योगेश ठीक, नवी पेठ