वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करणे हा शासनाचा संकल्प : एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 11:41 AM2022-09-03T11:41:36+5:302022-09-03T11:42:14+5:30
वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल...
पुणे : शहरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करण्याचा शासनाचा संकल्प आहे. त्यासाठी उड्डाणपुलांची रखडलेली कामे, मेट्रो विस्ताराच्या कामांना गती, चांगले रस्ते उपलब्ध करून देणे यासोबतच सार्वजनिक बससेवेत सुधारणा करणे यावर शासनाचा भर असणार आहे. त्यादृष्टीने फेम २ अंतर्गत ई-बसची सुविधा महत्त्वाची ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
पुणे स्टेशन ई-बस डेपोचे उद्घाटन आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाला फेम २ अंतर्गत प्राप्त ९० ई-बसच्या लोकार्पण सोहळ्याचे शुक्रवारी (दि. २) आयोजन केले होते, त्यावेळी शिंदे बोलत होते. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय आयुक्त सौरभ राव, आरटीओ अजित शिंदे, पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरुरे यांची उपस्थिती होती.
यानंतर उपस्थितांच्या हस्ते पुणे स्टेशन ई-बस डेपोचे उद्घाटन आणि ई-बसचे लोकार्पण, यासह पीएमपी कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या प्रतीक्षालय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुणे शहरासाठी येत्या काळात मेट्रोचा विस्तार करून एकात्मिक वाहतूक व्यवस्था उभारण्यात येईल. यासाठी विविध प्रकारच्या ॲपचे आणि ई-प्लॅटफॉर्मचे एकत्रीकरण करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रभावी वापर निश्चित करण्यात येईल. ई-बससेवेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणील.
फेम २ अंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानाचा उद्देश हरित ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देत कार्बन उत्सर्जन कमी करणे आहे. यामुळे विकसित देश म्हणून ओळख होण्यास मदत होणार आहे. प्रदूषण कमी करून नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ही सुविधा महत्त्वाची आहे. पुणे शहराने ई-मोबिलिटीच्या दिशेने सर्वांत पहिले पाऊल उचलले, ही गौरवास्पद बाब आहे.
- डॉ. महेंद्रनाथ पांडे, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री
राज्यातील पूर्ण सार्वजनिक वाहतूक सुविधा पर्यायी इंधनाच्या साहाय्याने चालवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात प्रयत्न करण्यात येत आहेत. पीएमपीएमएलने सर्व चार्जिंग स्टेशन सौर ऊर्जेवर रूपांतरित करावे आणि शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्येय गाठण्याच्या दिशेने प्रयत्न करावेत.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री