पुणे वाहतूक शाखेची जबाबदारी महिला अधिकाऱ्याकडे; पूर्वीच्या उपायुक्तांना रिपोर्ट करण्याचेही आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 07:40 PM2022-10-21T19:40:03+5:302022-10-21T19:40:46+5:30
पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा महत्त्वपूर्ण निर्णय....
- किरण शिंदे
पुणे : शहरातील वाहतूक कोंडी आता नित्याचीच बाब झाली आहे. वारंवार सांगूनही नियोजनावर भर देण्याऐवजी वाहतूक पोलिसांचे लक्ष वसुलीवर असल्याचे दिसून आले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडत असल्याने शहरातील सर्वच रस्त्यावर मुख्यत्वे मध्यवर्ती भागात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी सोडवण्याऐवजी वाहतूक पोलीस मात्र दंड वसुली करण्यावरच भर देत असल्याचे चित्र दोन दिवसांपूर्वी दिसून येत होते. त्यानंतर आता पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
वाहतूक शाखेचा कारभार सक्षम महिला पोलीस अधिकारी म्हणून ओळख निर्माण झालेल्या भाग्यश्री नवटके यांच्याकडे सोपवला आहे. इतकेच नाही तर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांना वाहतूक शाखेच्या संदर्भातील कामकाज व कर्तव्याचा अहवाल भाग्यश्री नवटके यांना सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. भाग्यश्री नवटके या सध्या आर्थिक व सायबर गुन्हे विभागाच्या पोलीस उपायुक्त आहे. त्यांच्या पदाचा कार्यभार सांभाळून त्या वाहतूक शाखेच्या कामकाजावर देखरेख ठेवणार आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एका जाहीर कार्यक्रमात शहरातील वाहतूक कोंडी हे माझे अपयश आहे अशी कबूली दिली होती. पोलीस उपायुक्त किंवा पोलीस काम करत नसतील तर नेतृत्वाच्या नात्याने ती माझी जबाबदारी आहे. मात्र यापुढील काळात अधिकाधिक कर्मचारी रस्त्यावर दिसतील असं आश्वासनही त्यांनी दिले होते. त्यानंतर त्यांनी पुण्यातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे यापुढील काळात वाहतूक पोलीस रस्त्यावर उभे राहून वाहतुकीचे नियमन करणार का आणि पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.