SSC Result: प्रतीक्षा संपली! उद्या दहावीचा निकाल 'या' संकेतस्थळावर पाहता येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 07:35 PM2022-06-16T19:35:48+5:302022-06-16T19:40:50+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली माहिती
पुणे : दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा अखेर संपली असून आज (दि.17) दुपारी 1 वाजता इयत्ता दहावीचा निकाल मंडळाने जाहीर केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गुरुवारी ही माहिती दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (एसएससी बोर्ड) पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.१० वी) घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यभरातून तब्बल 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थी बसले आहेत.
गेल्या आठवड्यात इयत्ता बारावीचा निकाल लागला होता. तेव्हापासून दहावीच्या निकालाकडे विद्यार्थ्यांचे डोळे लागले होते. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही ट्विटर द्वारे निकालाची घोषणा केली. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील निकालाची प्रत (प्रिंट) देखील घेता येईल.
परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. ही छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.
निकालासाठी मंडळाने जाहीर केलेले अधिकृत संकेतस्थळ:
www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in
https://lokmat.news18.com
या संकेतस्थळावर मिळेल अतिरिक्त माहिती :
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.
- www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध
होणार असून निकालाबाबतचा अन्य तपशील उपलब्ध होईल.
अशी करा गुणांची पडताळणी:
निकालानंतर विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) इतर कोणत्याही विशिष्ट विषयांत विद्यार्थ्याला गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन किंवा स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने स्वतः किंवा शाळामार्फत अर्ज करता येईल. हा अर्ज मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ http://verification.mh-ssc.ac.in यावर करता येईल. त्यासाठी आवश्यक अटी, शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.
या दरम्यान करा अर्ज:
गुणपडताळणीसाठी सोमवार, दि. २० ते बुधवार, दि. २९ पर्यंत अर्ज करता येईल.
-छायाप्रतीसाठी सोमवार, दि. २० ते शनिवार, दि. ०९ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल.
- ऑनलाईन पध्दतीने शुल्क हे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय किंवा नेट बँकिंग याद्वारे भरता येईल.