पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या रिक्षाचालकांना आंदोलन भोवले; ३७ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 11:08 AM2022-12-14T11:08:16+5:302022-12-14T11:08:26+5:30
बाइक टॅक्सी बंद करण्याच्या मागणीसाठी सोमवारी ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेने आरटीओसमोर ठिय्या आंदोलन केले होते
पुणे : बेकायदेशीरपणे आंदोलन करून पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या आणि रस्त्यात रिक्षा सोडून देणाऱ्या ३७ रिक्षाचालक व रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली.
बाइक टॅक्सी बंद करण्याच्या मागणीसाठी सोमवारी ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेने आरटीओसमोर ठिय्या आंदोलन केले होते. रिक्षा संघटनांच्या मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती स्थापन केली. त्याची माहिती रिक्षा संघटनांना दिल्यानंतरही त्यांनी रॅपिडो बाइक टॅक्सी ऑनलाइन ॲप काढून न टाकल्यामुळे रिक्षा संघटनांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते.
पोलिसांनी सांगितल्यानंतरही रस्ता मोकळा केला नाही. कारवाईला सुरुवात केल्यानंतर वाटेत रिक्षा सोडून ते निघून गेले होते. त्यानंतर पोलिसांनी स्वत: पुढाकार घेऊन या रिक्षा बाजूला करून रस्ता मोकळा करुन दिला होता. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून ३७ जणांना अटक केली.