योग्य उपचार हीच मात्रा; ‘जीबीएस’चा रुग्ण वेळेत होऊ शकतो बरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 17:34 IST2025-02-07T17:30:28+5:302025-02-07T17:34:46+5:30

खोट्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

The right treatment is the right dose; GBS patient can recover in time | योग्य उपचार हीच मात्रा; ‘जीबीएस’चा रुग्ण वेळेत होऊ शकतो बरा

योग्य उपचार हीच मात्रा; ‘जीबीएस’चा रुग्ण वेळेत होऊ शकतो बरा

-  अंबादास गवंडी

पुणे :
गेल्या काही दिवसांपासून शहरात गुईनेल बॅरी सिंड्रोम (जीबीएस) रुग्णांची संख्या वाढत असली तरी हळूहळू त्याचा प्रभाव कमी हाेत आहे. हा आजार दुर्मिळ असून, बरा होण्यासाठी पाच ते सहा महिने कालावधी लागत आहे. वेळेत निदान आणि उपचार झाल्यास रुग्ण लवकर बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

गेल्या एक महिन्यापासून पुणे शहर आणि जिल्ह्यात जीबीएसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. हा आजार दुर्मिळ असल्यामुळे रुग्ण बरा होण्यासाठी वेळ लागतो. शिवाय उपचाराचा खर्च खूप असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या आजाराबाबत अनेक तर्कवितर्क वर्तविण्यात येत आहे. परंतु केंद्र शासनाकडून जीबीएसच्या उपचारपद्धती आणि रुग्णांच्या पुनर्वसनाबाबत मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये जीबीएस आजाराची तीव्रता लक्षात घेऊन इम्युनोथेरपी, इंट्राव्हिनस इम्युनोग्लोब्युलिन इंजेक्शन आणि प्लाझ्मा फेरेसिस करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे, रुग्णांना घरी सोडल्यावर स्नायूंची ताकद आणि कार्य वाढवण्यासाठी फिजिओथेरपी, आजारामुळे आलेले नैराश्य दूर करण्यासाठी मानसिक आधार, औषधोपचार आणि डॉक्टरांचा सल्ल्यावर भर दिला तर हे रुग्ण वेळेत बरे होतील.
 
प्लाझ्मा, आयव्हीआयजी असे दोन प्रकारे उपचार 
‘जीबीएस’च्या रुग्णांवर प्लाझ्मा आणि ‘आयव्हीआयजी’ इंजेक्शनद्वारे उपचार केले जातात. प्लाझ्मा उपचार पद्धतीत रुग्णाच्या शरीरातील दूषित प्लाझ्मा काढून तो बदलला जातो. याच वेळी ‘आयव्हीआयजी’ उपचारांमध्ये रुग्णाला ‘इम्युनोग्लोब्युलिन’ इंजेक्शन दिली जाते. अशा रुग्णांना आयव्हीआयजी इंजेक्शनचे देण्यात येते. यामुळे शरारीत जीबीएसचे जे ॲटिबाॅडी तयार झाले आहेत, त्यांना अकार्यक्षम करण्याचे काम इंजेक्शनद्वारे केले जाते.
 
‘जीबीएस’चा प्रभाव कमी
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात गुईलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) चे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत होते. परंतु या आजाराची तीव्रता सध्या कमी झाली असून, नव्याने सापडणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे. यामुळे दिलासा मिळाला आहे. गुरुवारपर्यंत पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून एकूण संशयित रुग्णसंख्या १७३ पाेहोचली आहे. परंतु यापैकी ६२ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.
 
मज्जातंतूवर होतो परिणाम
गुईलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) हा दुर्मीळ प्रकारचा आजार असून, या आजारात रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी झाल्यावर मज्जातंतूवर परिणाम होतो. त्यामुळे पायाच्या व हातांच्या स्नायूंमधील ताकद कमी होते. श्वास घेण्यास त्रास होतो. साधारणपणे अतिसार, जुलाब, उलट्या तसेच फ्लू सारखे आजार झालेल्या रुग्णांमध्ये हा आजार आढळून येतो.

दिनांक सापडलेले रुग्ण

१ फेब्रुवारी ०९

२ फेब्रुवारी ०६

३ फेब्रुवारी ०४

४ फेब्रुवारी ०३

५ फेब्रुवारी ०४

६ फेब्रुवारी ०३

दोन आठवड्यांत उपचार घेणे आवश्यक आहे. आयव्हीआयजी इंजेक्शन आणि प्लाझ्माद्वारे यावर उपचार केले जातात. रुग्णांच्या रक्तांमध्ये जे अँटिबाॅडी तयार झाले आहेत, त्याचा प्रभाव कमी करतात; परंतु जे अँटिबाॅडी नसांना चिकटलेले आहेत, त्यांना निघायला वेळ लागतो. त्यामुळे दोन आठवडे आजार वाढतो. त्यानंतर दोन आठवडे स्थिर राहतो. चार ते सहा आठवड्यांनी आजार कमी होण्यास सुरुवात होते. मात्र, काही रुग्णांना वेळ लागतो.
- डाॅ. नीलेश पळसदेवकर, न्यूरोलाॅजिस्ट

Web Title: The right treatment is the right dose; GBS patient can recover in time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.