युवकांमध्ये वाढताेय ह्रदयविकारांचा धाेका! 'ही' लक्षणे असतील तर काळजी घ्या
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: December 1, 2023 06:54 PM2023-12-01T18:54:20+5:302023-12-01T18:55:35+5:30
दरवर्षी जवळपास ५८ लाख व्यक्ती असंसर्गजन्य आजारांमुळे आपला जीव गमावतात....
पुणे : कोलेस्टेरॉल, रक्तदाबामध्ये वाढ, व मधुमेहासह इतर अनेक, जीवनशैलीमुळे होणारे आजार सध्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचे (सीव्हीडी) मोठे कारण बनत आहेत. याशिवाय मानसिक तणाव, धूम्रपानासारख्या चुकीच्या सवयी आणि अतिरिक्त व्यायामामुळे हृदयविकाराचा झटका आणि ह्रदयांच्या रक्तवाहिन्यांचे आजार (सीएडी) सारख्या हृदयविकाराच्या समस्यांची शक्यता वाढते, विशेषत: तरुणांमध्ये याचे जास्त प्रमाण दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.
पन्नास ते साठ वर्षांपूर्वी आपल्याकडे सर्वाधिक मृत्यू हे टीबी, काॅलरा, देवी आदी संसर्गजन्य आजारांमुळे हाेत. याचे कारण हे अस्वच्छता, जनजागृतीचा अभाव असे. पण आता त्याबाबत जनजागृती झाली आणि हे मृत्यू अत्यल्पावर आले. परंतू, आता देशात सर्वात जास्त मृत्यू संसर्गजन्य आजारांमुळे नाही, तर मधुमेह, ह्रदयविकार यांसारख्या असंसर्गजन्य आजारांमुळे होताना दिसून येत आहे. दरवर्षी जवळपास ५८ लाख व्यक्ती असंसर्गजन्य आजारांमुळे आपला जीव गमावतात.
याची लक्षणे ओळखा :
- छातीत तीव्र वेदना, हात, जबडा, पाठ आणि मानेपर्यंत पसरणारी वेदना, धाप लागणे ही हृदयविकाराची काही लक्षणे आहेत.
- 30 मिनिटांपेक्षा जास्त काळ छातीत दुखत असताना घाम येणे हा तर हृदयविकाराचा झटका मानला जातो.
- तीव्र ढेकर आणि त्यासोबत पोटाच्या वरच्या भागात वेदना होणे हे देखील काही वेळा हृदयविकाराचा झटका येण्याचे लक्षण असू शकते.
- काही लोकांनामध्ये सिंकोप स्ट्रोक (थोड्या कालावधीसाठी शुद्ध हरपणे) किंवा अचानक हृदयाचे कार्य बंद होण्याची शक्यता देखील दिसून येते.
- हृदयरोगाचा इशारा देणाऱ्या सर्व लक्षणांबाबत जागरूक राहावे.
- या आजाराचे लवकरात लवकर निदान होणे खूप महत्त्वाचे आहे.
काय आहे उपाय
- ह्रदयविकारात औषधोपचार व्यतिरिक्त कोरोनरी अँजिओप्लास्टी करावी.
- हृदयातील ज्या धमन्यांमध्ये अडथळे निर्माण झालेले आहेत त्या मध्ये बायोरिसॉर्बेबल स्टेन्टचे इम्प्लांटेशन केले जाते.
- हे स्टेंट कालांतराने विरघळतात आणि त्यामुळे धमन्या त्यांच्या सामान्य कार्य आणि आकारात परत येतात.
ह्रदयविकारासह इतर सर्व असंसर्गजन्य आजारांचा धोका कमी करण्यासाठी जीवनशैली आणि आहाराच्या सवयींमध्ये बदल करावेत. हे बदल खूपच सहज सोपे असतात. हृदय आणि एकंदरीत शरीराचे आरोग्य जपण्यामध्ये या जीवनशैलीतील बदलांची महत्त्वपूर्ण भूमिका असते.
- डॉ अभय सोमाणी, ह्रदयराेगतज्ज्ञ