६५ वर्षांवरील महिलांना योजना लागू नाही; लाडक्या बहिणीत दुजाभाव, पुण्यातून मनसेचा आरोप
By राजू इनामदार | Published: October 10, 2024 01:52 PM2024-10-10T13:52:01+5:302024-10-10T13:52:31+5:30
६५ वर्षांवरील महिला तुमच्या बहिणी नाहीत का? मतदार म्हणून त्या फारशा प्रभावी राहणार नाहीत अशी भीती तुम्हाला वाटते का? मनसेचा सवाल
पुणे: सरकारच्या लाडकी बहिण योजनेत बहिणींबाबत दुजाभाव केल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनाधिकार सेनेने केली. ६५ वर्ष वयांवरील महिलांना ही योजना लागू होत नाही. या वयातील महिला तुमच्या बहिणी नाहीत का? किंवा मतदार म्हणून त्या फारशा प्रभावी राहणार नाहीत अशी भीती तुम्हाला वाटते का? असे प्रश्न जनाधिकार सेनेने उपस्थित केले आहेत.
सरकारच्या या लाडकी बहिण योजनेत वयाची अट टाकण्यात आली आहे. ६५ वर्ष वय असणाऱ्या महिलांना ही योजना लागू नाही. त्यांना यात सहभागी करून घेण्यात येणार नाही. जनाधिकार सेनेचे राज्य अध्यक्ष हेमंत संभूस यांनी सांगितले की ही अट अनाकलनीय आहे. सरकार जनतेबाबत कोणताही दुजाभाव करणार नाही अशी शपथ मुख्यमंत्र्यांपासून प्रत्येक मंत्ऱ्याला घ्यावी लागते. तरीही या योजनेत ही अट टाकण्यात आली. यातून सरकारनेच महिलांचे दोन गट केले असल्याचे दिसते. हा दुजाभावच आहे.
वास्तविक या वयातच वैद्यकीय, कौटुंबिक अशा अनेक अनेक अडचणीसाठी महिलेला मदतीच्या हाताची गरज असते. ६५ वर्षे वयावरील महिलांसाठी दुसऱ्या सरकारी योजना आहेत असे सांगण्यात येते, मात्र त्या योजनेत पात्र होण्यासाठीच्या अटी किचकट आहे, कागदपत्र, वयाचा दाखला, निराधार असल्याचा दाखला अशा इतक्या किचकट गोष्टी आहे की महिला त्या वाटेला जातच नाहीत. त्यामुळे सरसकट दरमहा १५०० रूपये देणाऱ्या या योजनेची खरी गरज याच ६५ वर्षे वयापुढील महिलांना आहे असे संभूस म्हणाले. सरकारची मुदत आहे तोपर्यंत सरकारने ही बदलावी अशी मागणी त्यांनी केली.