Pune Metro: पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे उदघाटन झाले खरे; पण थांबा! येथे बदलावी लागेल ‘मेट्रो’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 09:40 AM2023-08-02T09:40:38+5:302023-08-02T09:40:59+5:30
उदघाटनाच्या पहिल्याच दिवशी ‘लोकमत’ प्रतिनिधींनी या मार्गांचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर हे चित्र पाहायला मिळाले...
प्रज्वल रामटेके / अंकिता कोठारे
पुणे : अनेक दिवसांपासून पुणेकरांसाठी चर्चेचा विषय ठरलेल्या पुणे मेट्रोच्या दुसरा टप्प्याचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले खरे; पण थांबा! यापुढील काळात तुम्हाला जर शिवाजीनगर ते रूबी हॉल या स्थानकावर जायचं असेल तर सिव्हिल कोर्ट या स्थानकावर तुम्हाला मेट्रो बदलावी लागणार आहे, हे तुम्हाला माहितीये का? जाणार असाल तर इथे कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक नसल्याने पहिल्यांदा गेल्यावर तुमची तारांबळ उडू शकते. शिवाजीनगर येथून आल्यावर भुयारी स्थानकावर उतरावे लागते. त्यानंतर दुसरी मेट्रो बदलण्यासाठी तब्बल तीन मजले वर जावे लागते. उदघाटनाच्या पहिल्याच दिवशी ‘लोकमत’ प्रतिनिधींनी या मार्गांचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर हे चित्र पाहायला मिळाले.
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. १ ) मेट्रोच्या दोन मार्गिकांचे उद्घाटन केले. शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर दुपारी १२:४५ मिनिटांनी मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. उद्घाटनानंतर लोकमतच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. मात्र पहिल्याच दिवशी या मार्गांमध्ये अनेक अडचणी समोर आल्या. सिव्हिल कोर्ट येथे मेट्रो स्थानकांचा इंटरचेंज असल्याने अनेक नवीन प्रवाशांना थोडी अडचण निर्माण होत आहे. जागोजागी मार्ग दाखविण्यासाठी दिशादर्शक पाट्या आवश्यक आहेत. परंतु अशा पाट्या मेट्रो स्थानकांवर दिसत नसल्याचे पाहायला मिळाले.
ठळक मुद्दे
दुचाकी, चारचाकी आणि ओला कॅबपेक्षाही ‘मेट्रो’ स्वस्त
या प्रवासासाठी मेट्रोने दोन्ही बाजूचा टिकीट खर्च ६० रुपये आहे. तर दुचाकीने प्रवास खर्च १०० रुपये ते २०० रुपये येतो. तर चारचाकीने प्रवास केला असता ३०० रुपये इतका येतो. पीएमपीने प्रवास केल्यास २५ रुपये ते ३५ रुपये इतका खर्च येतो. मात्र ओला कॅब केली असता २४० रुपये ते २९० रुपये इतका खर्च येतो.
शिवाजीनगर ते पिंपरी चिंचवड या दरम्यान रेंज हिल आणि खडकी मेट्रो स्थानकाचे काम अपूर्ण आहे. मात्र बोपोडी, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी भोसरी (नाशिक फाटा), संत तुकाराम नगर, आणि पी.सीएमसी या स्थानकांची कामे पूर्ण झाली आहेत. परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांना मेट्रो स्थानकांवरून खाली जाऊन एक्झिट करावी लागते. तर त्याच मेट्रोमध्ये परत जाण्यासाठी पुन्हा तिकिटाने एन्ट्री करावी लागते. आज गर्दी नसताना प्रवास सोयीस्कर झाला. परंतु गर्दीच्या वेळी ही गोष्ट करण्यासाठी बराच वेळ खर्च होणार आहे.
बऱ्याच प्रवाशांनी परतीची तिकिटे काढली असता त्यांना बाहेर पडताना क्यूआर कोड स्कॅन होत नाही. इतर एंट्री करतानादेखील तिकिटाचे क्यूआर कोड स्कॅन होत नाहीत. पयार्याने त्यांना दुसऱ्या मार्गाच्या फाटकातून बाहेर पडावे लागते. यामध्ये प्रवाशांचा बराच वेळ वाया जातो.
शिवाजीनगर मेट्रो स्टेशन येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी अनेक सुरक्षा रक्षक नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत. या ठिकाणी मेट्रोची वेळ, विना तिकीट प्रवास केल्यास दंड आकारण्यात येईल असे फलकदेखील लावण्यात आले आहे. तर प्रवाशांना स्वत: तिकीट काढता येईल अशी यंत्रणादेखील बसविण्यात आली आहे.
शिवाजीनगर मेट्रो स्टेशन ते पिंपरी चिंचवड मेट्रो स्टेशन या दोन स्थानकातील अंतर १३ किमीचे आहे. यासाठी मेट्रोने २२-२५ मिनिटे वेळ लागतो. कारने प्रवास करायला ३१ मिनिटे लागतात. दुचाकीने २९ मिनिटे, पीएमपीएल बसने ५० मिनिटे ते १ तास लागतो. शिवाजीनगर ते पिंपरी चिंचवड प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी पुण्याचे नवीन आणि निसर्गरम्य दर्शन घडते. यामध्ये हिरवी झाडी आणि यामध्ये तिरंगा फडकतानाचे सुंदर दर्शन तुम्हाला अनुभवता येते.