दाम्पत्याला गुंगीचे औषध देऊन नोकरानेच केले २४ लाख लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 02:02 PM2022-12-07T14:02:55+5:302022-12-07T14:03:05+5:30
चाळीस तोळे सोने, हिऱ्यांच्या दागिन्यांचा समावेश
पुणे : पिंपळेवस्ती-मुंढवा परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ दाम्पत्याला नोकराने जेवणातून गुंगीचे औषध देऊन, रोकड, हिरे, सोन्याचे दागिने असा तब्बल २३ लाख ९८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सकाळी जेव्हा दोघांना जाग आली तेव्हा नोकर पसार झालेला होता. ही घटना मुंढव्यातील पिंगळे वस्तीमधील फॉरेस्ट कॅसलमध्ये रविवारी रात्री घडली.
याप्रकरणी एका ३७ वर्षांच्या महिलेने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नोकर नरेश शंकर सौदा (वय २२) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे आई-वडील हे सेवानिवृत्त झाले असून, दोघे एकटेच राहतात. त्यांना घरातील कामासाठी नोकराची गरज होती. ऑनलाइन नोकराची सेवा उपलब्ध करून देणाऱ्या एका कंपनीच्या मार्फत मुंबईहून त्यांनी नरेश याला कामासाठी पुण्यात आणले होते. तो मूळचा नेपाळचा असून एक महिन्यापासून तो त्यांच्याकडे काम करत होता. त्यांच्याच घरातील नोकरासाठी असलेल्या खोलीत तो राहात होता. पगाराचे पैसेदेखील त्याने महिना पूर्ण झाल्यानंतर घेतले होते. त्याने रविवारी रात्री फिर्यादींच्या आई-वडिलांना जेवणातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर घरातील रोकड, सोन्याचे, हिऱ्याचे दागिने असा २३ लाख ९८ हजार रुपयांचा ऐवज चोरी करून पळ काढला. गुंगीच्या औषधामुळे त्यांना गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्यांना जाग आली. घरातील नोकर व किमती ऐवज नसल्याचे लक्षात आल्यानंतर दाम्पत्याला घरात चोरी झाल्याचे समजले. या प्रकाराची सोसायटीतील एका व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली होती.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ज्येष्ठ दाम्पत्याला वैद्यकीय मदत दिली. त्यांच्याकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत, दाम्पत्यांनी जेव्हा आरोपी नोकराला कामावर ठेवले तेव्हा त्याची कोणत्याही प्रकारची माहिती न पोलिस ठाण्याला दिली न त्याची पडताळणी करून घेतली. पोलिसांनी प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार, नोकराची माहिती काढली असून, त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाल्याचे लकडे यांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक शिवाजी काटे अधिक तपास करीत आहेत.