Pune Porsche Car Accident: 'बाळा"च्या आई - बापाला ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 02:52 PM2024-06-02T14:52:13+5:302024-06-02T14:52:42+5:30
रक्त नमुना फेरफार प्रकरणात शिवानी अग्रवालचा समावेश, तसेच विशाल अग्रवाल यांच्या घराची झाडाझडती यासाठी सरकारी वकिलांनी मागितली पोलीस कोठडी
Pune Porsche Car Accident : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या कार अपघातामुळे राज्यासह देशभरात संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे. बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या मुलाने भरधाव वेगाने आलिशान पोर्शे कार चालवत दुचाकीला धडक दिल्याने दोघांना विनाकारण जीव गमवावा लागलाय. या प्रकरणात अनेक धक्कादायक प्रकरणे उघडकीस येऊ लागली आहेत. पोलिसांनी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालसहित कुटुंबाची कुंडली बाहेर काढली आहे. आता तर बाळाच्या आईनेही या घटनेत पुरावे झाकल्याचे समोर आले आहे. मुलाच्या वैद्यकीय चाचणीदरम्यान ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. ते मुलाच्या आईचे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तशी कबुली आईने पोलिसांसमोर दिली आहे. दोघांचीही सखोल चौकशी करण्यासाठी आज कोर्टात सरकारी वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आलाय. त्यामद्धे विशाल आणि शिवानी अग्रवाल यांना ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.
न्यायालयात सरकारी वकिलांनी काही महत्वाचे मुद्दे मांडत पोलीस कोठडी मागितली. विधी संघर्षात बालकाचे हे पालक आहेत. रक्त बदलण्याच्या प्रकरणात पालकांचा थेट समावेश आहे. शिवानी अग्रवाल हिला कोणीतरी सांगितलं आहे की ससून मध्ये जायला. रक्ताचे नमुने देण्यासाठी शिवानी यांना कोणी सांगितलं यासाठी तपास करायचा आहे. सखोल चौकशी साठी ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी. असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय. साक्षीदार, एफ एस एल यांच्या तपासातून निष्पन्न झालं की विधी संघर्षात बालकाच्या ऐवजी आईचे रक्त वापरण्यात आले. या सगळ्या षडयंत्रमध्ये आणखी काही आरोपी असण्याची शक्यता आहे. दोन्ही आरोपींचे डी एन ए सँपल घ्यायचे आहेत. ३ लाख रुपये कोणाकडून घेतले याचा तपास करायचा आहे. मूळ रक्त नमुने आणि त्यातील सिरींज कोणाला दिली याचा शोध घ्यायचा आहे. विशाल, शिवानी यांच्या घराची झाडाझडती आहे. तसेच सी सी टिव्ही फुटेज जे मिळालं आहे त्यात छेडखानी झालीये त्याची चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडी चौकशी अधिकाऱ्यानी मागितली. या मुद्द्यांवरून दोघांना ५ जूनपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. आरोपीच्या वकिलांनीसुद्धा युक्तिवाद केला. १९ तारखेला अपघात झाल्यानंतर घराची झाडाझडती घेण्यात आली आहे. सी सी टिव्ही सुद्धा जप्त करण्यात आले आहेत. दोन्ही आरोपींनी स्वतःहून पोलिसांना सरेंडर केले आहे. तपास अधिकाऱ्यांना कधी ही गरज लागली तर आरोपी हजर राहतील. असे मुद्दे मांडत म्हणून न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती.