घरची परिस्थिती बेताची; ‘कमवा व शिका’ योजनेत काम; शिक्षण पूर्ण करत कन्या पोलीस उपनिरीक्षक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 11:51 AM2023-07-26T11:51:03+5:302023-07-26T11:51:34+5:30
फेब्रुवारी २०२० मध्ये जाहिरात आली, कोरोनाचं संकट आल्याने परीक्षा ४ वेळा पुढे ढकलली पण कन्येने माघार घेतली नाही
सासवड : पुरंदर तालुक्यातील दुर्गम कुंभोशी (ता. पुरंदर) येथील दुर्गम भागातील अमृता भरत बाठे या शेतकरी कन्येने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण होत नव्या पिढीसमोर आदर्श ठेवला आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने तिने ‘कमवा व शिका’ योजनेत काम करीत शिक्षण पूर्ण करत खाक्या वर्दीला गवसणी घातली आहे, तर एमपीएससीचा अभ्यास करताना पुण्यातील आर्थिक खर्चाची गणिते जुळवत खासगी शिकवण्यामध्ये काम करत अखेर यश मिळविले.
फेब्रुवारी २०२० मध्ये जाहिरात आली, पण मध्येच कोरोनाचं संकट आल्याने परीक्षा ४ वेळा पुढे ढकलली गेली आणि तब्बल १९ महिन्यांनी लांबली व अमृताला पुण्यातून गावाकडे यावे लागले. तेव्हा आजी -आजोबांकडे आजोळी वागजवाडी येथे अभ्यासासाठी राहून परीक्षा दिल्या. मराठा आरक्षण समस्येमुळे अमृताचा निकाल ४ महिने लांबला व ४ जुलैला निकाल लागला आणि अमृताची पोलिस उपनिरीक्षक पदी अखेर निवड झाली. घरच्यांना नव्हे नातेवाइकांसह तर गावाला आनंद झाला. सत्कार व कौतुक झाले.
मी माझ्या निर्णयावर ठाम राहून अभ्यास सुरू ठेवला
माझे शिक्षण व नंतरची धडपड यातून मला एवढंच सांगावसं वाटतं की, २०२० ते २०२३ काळ माझ्यासाठी व माझ्या कुटुंबीयांसाठी खूप चिंतेचा होता. लग्नासाठी घरचे मागे लागत होते, पण मी माझ्या निर्णयावर ठाम राहून अभ्यास सुरू ठेवला. प्रयत्न करीत राहिले की नक्की यश मिळतं. - अमृता बाठे, कुंभोशी.