Pune Airport : पुणेकरांना झाले आकाश खुले..! हवेत झेपावताहेत दरराेज २०० विमाने
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 12:43 IST2024-12-21T12:43:27+5:302024-12-21T12:43:27+5:30
पुण्यातून देशातील ३५ विमानतळांसह तीन आंतरराष्ट्रीय उड्डाणांना थेट कनेक्टिव्हिटी जोडण्यात आली आहे.

Pune Airport : पुणेकरांना झाले आकाश खुले..! हवेत झेपावताहेत दरराेज २०० विमाने
पुणे : लोहगाव येथील नव्या टर्मिनलवरून विमान उड्डाणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा विमानांची संख्यादेखील वाढली आहे. शनिवार, रविवार तर तब्बल २०० पेक्षा जास्त विमान उड्डाणे होत आहेत शिवाय पुण्यातून देशातील ३५ विमानतळांसह तीन आंतरराष्ट्रीय उड्डाणांना थेट कनेक्टिव्हिटी जोडण्यात आली आहे. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. त्याचा फायदा प्रवासी आणि पुणेविमानतळ प्रशासनाला होत आहे.
पाच महिन्यांपूर्वीच नव्या टर्मिनलवरून विमान उड्डाणे सुरू करण्यात आले. सुरुवातीला जुन्या टर्मिनलवरून नव्या टर्मिनलवर दोन कंपन्यांना परवानगी देण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्यांने विमानांची संख्या वाढविण्यात आली तसेच दैनंदिन विमान उड्डाणांची संख्या साधारणपणे १९० पर्यंत असून, शनिवार, रविवार यांची संख्या वाढत आहे. पुण्यातून पूर्वी दैनंदिन १५० ते १६० विमानांचे उड्डाण होत होते. त्यामुळे प्रवाशांची संख्या त्यावेळी २० ते २५ हजार इतके होते. मात्र, सध्या पुणे विमानतळावरून उड्डाणे वाढल्याने दैनंदिन ३० हजारांच्या पुढे प्रवासी येथून प्रवास करत आहेत.
नव्या टर्मिनलवर अत्याधुनिक सोयी-सुविधांमुळे प्रवास आरामदायी होत आहे. त्यातच पुणे विमानतळ प्रशासनाने देशांतर्गत राज्ये, शहरांना 'उडान' या योजनेंतर्गत १२ ठिकाणी कनेक्टिव्हिटी वाढविली आहे. त्याचा फायदा पुणेकर प्रवाशांना होत असून, विमानाने प्रवास करणे सोपे झाले आहे. त्यातच उडान याेजनेमुळे कमी दरात तिकिटे उपलब्ध होत असल्याने बहुतांश प्रवासी विमानाच्या माध्यमातून हवाई मार्गाने प्रवास करण्यावर भर देत आहेत. भविष्यात धावपट्टीचा विस्तार करण्यात येणार आहे. यामुळे मोठ्या विमानांची संख्या वाढविण्यात येणार आहे. धावपट्टीचा विस्तार झाल्यावर आंतरराष्ट्रीय उड्डाणदेखील वाढण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा पुणेकर प्रवाशांना आणि विमान प्रशासनाला होणार आहे.
'उडान' योजनेचा फायदा
पुणे विमानतळावरून 'उडान' योजनेंतर्गत नव्या सहा ठिकाणी विमानसेवा सुरू करण्यात आले आहे. याशिवाय अहमदाबाद, चेन्नई, भोपाळ या ठिकाणी उड्डाणांची संख्या वाढविली आहे. त्यामुळे प्रवाशांना हवाई प्रवास सोयीचे झाले आहे. उड्डाणामुळे पुण्यातून १ हजार १८० विमान उड्डाणे झाले आहेत. त्यातून ६९ हजार ६४६ प्रवाशांनी प्रवास केला आहे. पुण्यातून सिंधुदुर्ग, नांदेड, जळगाव, किशनघर, भावनगर, प्रयागराज या शहरांसाठी ही विमाने सुरू आहेत.