स्मशानभूमीतील अर्धवट जळालेल्या लाकडावरून खुनाच्या गुन्ह्याची उकल; इंदापूरातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 11:22 AM2024-11-26T11:22:41+5:302024-11-26T11:23:36+5:30
केवळ स्मशानभूमीमध्ये मिळालेली लाकडे व पडलेल्या रक्तावरून घातपाताचा संशय बळावल्याने पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला
पुणे : तावशी, ता. इंदापूर येथील स्मशानभूमीमधील लाकडामध्ये मानवी अवयव जळत असून बाजूला मोठ्या प्रमाणात रक्त पडलेले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अर्धवट जळालेल्या लाकडावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आणला असून याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
दादासाहेब मारुती हरिहर (३०) आणि त्याचा मित्र विशाल सदाशिव खिलारे (२३, दोघे रा. गोखळी, ता. फलटण, जि. सातारा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हरिभाऊ धुराजी जगताप (७४, रा़ गंगाखेड, परभणी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सोमवारी (दि. २५) याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. तावशी, ता. इंदापूर येथील स्मशानभूमीत १६ नोव्हेंबर रोजी लाकडामध्ये मानवी किंवा अमानवी अवयव जळत असून बाजूला मोठ्या प्रमाणात रक्त पडलेल्याची अशी माहिती तावशी येथील पोलिस पाटलांकडून मिळाली. वालचंदनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी राजकुमार डुणगे व त्यांचे सहकारी यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी केल्यावर त्याना जळालेली हाडे आणि रक्ताचा सडा निदर्शनास आला.
तपासासाठी वालचंदनगर पोलिस ठाण्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले. स्मशानभूमीत मिळालेली लाकडे कोणत्या वखारीतील आहेत, त्याचा तपास इंदापूर, माळशिरस व फलटण तालुक्यात करण्यात आला. त्यात गुणवरे, ता. फलटण येथील वखारीतील ही लाकडे असून, ती दादासाहेब हरिहर व त्यांचा मित्र विशाल खिलारे यांनी खरेदी करून अंत्यविधीसाठी वाहनांमधून नेल्याची माहिती मिळाली.
त्यावरून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. या चौकशीत लग्न जुळवणाऱ्या जगताप मामाची आपल्या पत्नीवर वाईट नजर असल्याचा संशय आराेपी दादासाहेब हरिहर याला हाेता. या संशयातून मित्र विशाल खिलारे याच्या मदतीने कट रचून जगताप याला दांडक्याने मारून ठार केले. नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी स्मशानभूमीत जाळून टाकले. पोलिसांनी याची माहिती त्यांचा मुलगा सचिन हरिभाऊ जगताप (४६, रा. कोल्हापूर) यांना सांगून त्यांची फिर्याद घेतली.
या घटनेमध्ये तावशी स्मशानभूमीत नक्की काय घडले, याची पूर्ण माहिती अथवा पुरावा नसताना, केवळ स्मशानभूमीमध्ये मिळालेली लाकडे व पडलेल्या रक्तावरून घातपाताचा संशय बळावल्याने वालचंदनगर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने तपास करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे, सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ, तसेच सहायक फौजदार बाळासाहेब कारंडे, शैलेश स्वामी, पोलिस कर्मचारी गुलाबराव पाटील, गणेश काटकर, अजित थोरात, स्वप्नील अहिवळे, अजय घुले, नीलेश शिंदे, विक्रमसिंह जाधव आणि अभिजीत कळसकर यांनी ही कामगिरी केली.