सणासुदीलाच मोजला जातो आवाज; इतर दिवशी ध्वनी यंत्रणा धूळ खात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 04:08 PM2022-05-12T16:08:45+5:302022-05-12T16:08:54+5:30
पुणे : भोग्यांवरून राज ठाकरे यांच्याकडून अल्टिमेटम देण्यात आल्यानंतर नवनिर्माण सेनेने आंदोलन केल्यामुळे ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. अल्टिमेटम ...
पुणे : भोग्यांवरून राज ठाकरे यांच्याकडून अल्टिमेटम देण्यात आल्यानंतर नवनिर्माण सेनेने आंदोलन केल्यामुळे ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. अल्टिमेटम दिल्यानंतर केवळ १४ तासाच ध्वनिप्रक्षेपक यंत्रणेसंबंधीच्या ११ तक्रारींची नियंत्रण कक्षाकडे नोंद झाली होती. दरम्यान, सद्य:स्थितीत शहरात कार्यरत असलेल्या ३२ पोलीस ठाण्यांमध्ये आवाजाची पातळी मोजण्याचे प्रत्येकी १ ध्वनी प्रदूषण मापक यंत्र आहे. मात्र, तक्रार आल्यानंतरच किंवा सणासुदीच्या काळातच त्या यंत्रांचा वापर होत असल्याने इतर वेळी ही यंत्रे धूळ खात पडून राहत असल्याची स्थिती आहे.
शहरातील ध्वनी प्रदूषण पातळी नियंत्रणाची जबाबदारी ही पोलिसांवर सोपविण्यात आली आहे. त्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सातत्याने लक्ष असते. सणासुदीच्या काळात पोलिसांना आवाजाची पातळी नियंत्रित राहण्यासाठी दक्ष राहावे लागते. कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे दोन वर्षे सणासुदीवर निर्बंध होते. या काळात सार्वजनिक कार्यक्रम, उत्सव साजरे करण्यास बंदी होती. त्यामुळे ध्वनी प्रदूषण मापक यंत्राचा वापर करावा लागला नाही. राज ठाकरे यांनी भोंग्यावरून देण्यात येणाऱ्या अजानचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर ध्वनिप्रदूषणावर चर्चा सुरु झाली. एखाद्या ठिकाणी जोरात डीजे किंवा लाऊडस्पीकर चालू असण्याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यास पोलीस त्या ठिकाणी जाऊन संबंधितांना समज देतात; पण कारवाई होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
दरवर्षी होते कॅलिब्रेशन
ध्वनिमापक यंत्रांचे दरवर्षी कॅलिब्रेशन केले जाते. यंत्र सुस्थितीत आहे का, प्रिंटर त्याचे टोनर, शाई याची दुरुस्ती करून घेतली जाते. त्यामुळे यंत्र आवाजाची मोजणी करते आहे किंवा नाही, याची पाहणीदेखील या कॅलिब्रेशनमध्ये केली जाते. शासनाने निर्बंध हटविल्यानंतर सार्वजनिक कार्यक्रम होत आहेत. तसेच मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरदेखील पोलिसांकडून ध्वनी प्रदूषण मापक यंत्र सज्ज ठेवण्यात आली आहे.