Pune: ‘डीजे’चा दणदणाट त्रासदायकच ठरला, पुणेकरांची प्रतिक्रिया; यंदा १०० पेक्षा जास्त डेसिबलची नोंद
By श्रीकिशन काळे | Published: September 18, 2024 07:45 PM2024-09-18T19:45:18+5:302024-09-18T19:45:33+5:30
अनेक मंडळांनी आवाजाची मर्यादा ओलांडली असून कर्णकर्कश बरोबरच जोरदार दणके स्पिकरमधून बसत होते
पुणे: गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये यंदा गतवर्षीपेक्षा कमी आवाजाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी लक्ष्मी रोडवर १०१.२ डेसिबल आवाजाची पातळी होती, तर यंदा ती कमी होऊन ९४.८ डेसिबल नोंदवली गेली. पण तरी देखील लोकांना जो काही आवाज कानी पडला, तो त्रासदायकच ठरला, अशा प्रतिक्रिया काही पुणेकरांनी दिल्या. मंगळवारच्या रात्रीपेक्षाही बुधवारच्या सकाळी सर्वाधिक आवाजाची नोंद झाली. दुपारी १२ वाजता तर बेलबाग व होळकर चौकात ११८.५ डेसिबलची नोंद झाली आहे.
गेल्या २४-२५ वर्षांपासून ‘सीओइपी’ तंत्रज्ञान विद्यापीठातर्फे लक्ष्मी रोडवरील प्रमुख दहा चौकांमध्ये ध्वनी पातळीची नोंद होते. ही नोंद सीओइपीच्या उपयोजित विज्ञान आणि मानव्यविद्या विभागाचे प्रमुख डॉ. महेश शिंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली होते. त्यामध्ये इरा कुलकर्णी, मेहर रघाटाटे, मृणाल खुटेमाटे, ईशिता हुम्नाबादकर, आयुष लोहकरे, आदित्य फाळके, आदित्य संजीवी, तेजस जोशी, मोहित कंडाळकर आदींनी सहभाग नोंदवला. शास्त्रीय पद्धतीने ही नोंद झाली. लक्ष्मी रोडवर २४ तासांतील १० चौकांमध्ये नाेंद झाली.
चारही रस्त्यांवर डीजेचा दणदणाट
लक्ष्मी, केळकर, कुमठेकर, टिळक या चारही रस्त्यांवर ढोल ताशा सोबत डीजेचा दणदणाट ऐकण्यास मिळाला. पोलिसांनी आवाजाची मर्यादा सांगितली असूनही मंडळांनी ती ओलांडून स्पीकर लावले होते. कर्णकर्कश आवाजाबरोबच जोरदार दणकेही गाण्यांमधून बसत होते. असंख्य पुणेकरांनी डीजेच्या दणदणाटावर नाराजी व्यक्त केली असून त्रासदायक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
आठ वाजल्यावर दणदणाट !
पोलिस आणि प्रशासनाने पहिल्या दिवशी रात्रीपर्यंत केवळ मर्यादित डीजे वादनाला परवानगी दिली आणि अधिकाधिक पारंपरिक वाद्यांच्या गजरात लक्ष्मी रोडवर आली. परंतु, सकाळी ८ वाजल्यानंतर मात्र अनेक मंडळांनी दणदणाट सुरू केला. रात्रीपेक्षा बुधवारी (दि.१८) सकाळचा आवाज सर्वाधिक नोंदवला गेला.
गेल्या काही वर्षांतील आवाज
२०१० : १००.९
२०११ : ८७.४
२०१२ : १०४.२
२०१३ : १०९.३
२०१४ : ९६.३
२०१५ : ९६.६
२०१६ : ९२.६
२०१७ : ९०.९
२०१८ : ९०.४
२०१९ : ८६.२
२०२० : ५९.८
२०२१ : ५९.८
२०२२ : १०५.२
२०२३ : १०१.२
२०२४ : ९४.८
ध्वनी प्रदूषणाची पातळी मोजण्याचा पर्यावरणसंवेदी कार्याचा यंदा रौप्यमहोत्सव आहे. आम्ही २००१ पासून हे कार्य करतोय. लक्ष्मी रोडवरील प्रत्येक चौकातील आवाज आम्ही नोंदवतो. यंदा ध्वनी पातळी किती असेल, याची उत्सुकता होती. गेल्या वर्षी तुलनेत ती कमीच नोंदली गेली. - डॉ. महेश शिंदीकर, विभाग प्रमुख, उपयोजित विज्ञान व मानव्यविद्या विभाग, सीओईपी
प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे ध्वनी प्रदूषणाची नोंद केली. गतवर्षीपेक्षा ती कमीच नोंदली गेली. शिवाजीनगर ८५.६, सातारा रोड ८२.७, सारसबाग ८८.९, हडपसर ८२.४, विश्रांतवाडी ८१.३ डेसिबलची नोंद पहायला मिळाली. - जय शंकर सांळुखे, विभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे