डीजेचा आवाज वाढला अन् कान बधिर करून गेला! कान-नाक-घसा तज्ज्ञांकडे वाढली गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 02:45 PM2023-10-02T14:45:36+5:302023-10-02T15:40:33+5:30

आता जरी काहींना त्रास झाला नसला तरी काही वर्षांनी कर्णबधिरता येण्याचा धाेका निर्माण झाला आहे

The sound of the DJ was loud and deafening The rush to ear nose throat specialists increased | डीजेचा आवाज वाढला अन् कान बधिर करून गेला! कान-नाक-घसा तज्ज्ञांकडे वाढली गर्दी

डीजेचा आवाज वाढला अन् कान बधिर करून गेला! कान-नाक-घसा तज्ज्ञांकडे वाढली गर्दी

googlenewsNext

पुणे : डाॅक्टर माझ्या कानात शिट्टी वाजल्याचा आवाज येताेय, मला ऐकायला कमी येतंय, कान दुखताेय, कानाला दडा बसलाय, चक्कर येतेय, अशा तक्रारी घेऊन तरुणाई फॅमिली डाॅक्टरांसह कान-नाक-घसा तज्ज्ञांकडे येत आहेत. कारण काय, तर विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे व पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर बेधुंद हाेऊन तासन तास नाचणे. कान नाक घसा तज्ज्ञांच्या मते आता जरी काहींना त्रास झाला नसला तरी काही वर्षांनी कर्णबधिरता येण्याचा धाेका निर्माण झाला आहे.

विसर्जन मिरवणुकीमध्ये दाेन दिवस डीजे आणि पारंपरिक वाद्यांचा आवाज शहरात प्रचंड घुमला. ताे आवाज दाेन दिवस अगदी ८३ डेसिबलपासून १२९ डेसिबल इतका प्रचंड हाेता. त्यामध्ये तरुणाईने यथेच्छपणे थिरकण्याचा अनुभव घेतला. आता त्याचे दुष्परिणाम देखील भाेगावे लागत आहेत.
शहरातील लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता आणि टिळक रस्ता या प्रमुख चार रस्त्यांवरून विसर्जन मिरवणुका निघाल्या. त्यात डीजे स्पीकरच्या जणू भिंती उभारण्यात आल्या हाेत्या. त्यामधून बाहेर पडणाऱ्या कर्णकर्कश आवाजाने अनेकांच्या कानांच्या शिट्ट्या वाजल्या. त्याचप्रमाणे तासनतास ढाेल-ताशांच्या गजरामुळेदेखील अनेकांना कानाचा त्रास हाेत हाेता.

जाणवू लागली ही लक्षणे 

- कानात शिट्टी वाजल्याचा आवाज येणे
- ऐकायला कमी येणे
- कान सुन्न पडणे, कान दुखणे
- कानाला दडे बसणे

कानाची रचना आणि कार्य

- कानाचे बाह्यकर्ण, मध्यकर्ण व आंतरकर्ण असे तीन भाग असतात.
- बाह्यकर्ण हा कानाची पाळीपासून मधल्या कानापर्यंत जाणारा नलिकेसारखा मार्ग या दोन्हींनी बनलेला असतो. यालाच सामान्यपणे कान असे म्हणतात. येथे ज्या ध्वनीलहरी हानिकारक आहेत त्या फिल्टर करून आत साेडल्या जातात.
- मध्यकर्ण हा हवेने भरलेली जागा असून त्याच्या आतील टोकाला एक लंबगोल पडदा उभट आणि तिरकस असतो. ह्यालाच कानाचा पडदा किंवा कर्णपटल असे म्हणतात. बाहेरून येणाऱ्या ध्वनिलहरी या पडद्यावर आदळतात, त्यामुळे कर्णपटल कंप पावते.
- आंतरकर्ण याची रचना गुंतागुंतीची असते. ध्वनिलहरींचे विद्युत लहरींमध्ये रूपांतर होऊन श्रवण चेतांद्वारे त्या मेंदूकडे पाठवण्याचे काम हे करतात.

चिडचिडेपणा वाढणे, झाेप न येणे

कानाच्या तक्रारी घेऊन माझ्याकडे सात ते आठ रुग्ण आले हाेते. त्यांना ऐकायला कमी येणे, याबराेबरच इतर त्रास जसे- हृदयाची धडधड वाढणे, बीपी वाढणे, चिडचिडेपणा वाढणे, झाेप न येणे हे त्रास दिसून आले. यावेळी खूप आवाज हाेता. रहिवाशांनाही खूप त्रास झाला. यावर गंभीरपणे विचार हाेऊन त्यावर नियंत्रण येणे गरजेचे आहे. - डाॅ. राजेंद्र जगताप, जनरल प्रॅक्टिशनर्स, सहकारनगर

आता ९० डेसिबलच्या आतच आवाज हवा

गेल्या दाेन दिवसांत माझ्या क्लिनिकला चार ते पाच तरुण मुले कानाची तक्रार घेऊन आले हाेते. यामध्ये त्यांना कान दुखणे, ऐकायला कमी येणे, कानाला दडे बसणे, कानात शिट्टी वाजणे ही लक्षणे हाेती. ही मुले दीड - दाेन तास डीजेसमाेर नाचली हाेती, तर काहीजण रात्रभर मिरवणुकीत हाेते. बहुतेकांना कर्णनाद म्हणजे कानात शिट्टी वाजण्याचा त्रास हाेत हाेता. कानाच्या नसा नाजूक असतात. जेव्हा त्यावर आवाजाचे बम्बार्डिंग हाेते, तेव्हा त्या रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह थाेड्या काळापुरता थांबताे. मग नसांना रक्तप्रवाह हाेत नाही. त्यामुळे कानांच्या नसांचे काम कमी हाेते व त्याचा परिणाम म्हणून कानात शिट्टी वाजणे, कान दुखणे असे त्रास हाेताना दिसून येतात. अशा रुग्णांना ऑडिओमेट्री तपासणी करून रक्तप्रवाह नाॅर्मल हाेण्यासाठी औषधाेपचाराने उपचार करता येताे. त्यासाठी डाॅक्टरांकडे लवकर यावे. पाणी मारणे, गरम तेल टाकणे याने फरक पडत नाही. त्यासाठी आता ९० डेसिबलच्या आतच आवाज हवा. - डाॅ. नेत्रा पाठक, कान-नाक-घसा तज्ज्ञ

 माेठा आवाज हा कानाची एकप्रकारे विषबाधा 

आता लगेच त्रास हाेत नसला तरी पंधरा ते वीस वर्षांनी कानाच्या नसा कमकुवत हाेऊन कायमचा बहिरेपणा येण्याचा धाेका वाढला आहे. आताची विशीतील ही तरुणाई जेव्हा चाळिशीला पाेहोचेल, तेव्हा ही समस्या निर्माण हाेईल. माेठा आवाज हा कानाची एकप्रकारे विषबाधा आहे. डीजे, हिअरिंग लाॅस हाेताे. त्यासाठी त्यावेळी ना काेणते औषध काम करेल, ना काेणते डिव्हाईस म्हणजे हिअरिंग एड लावले तरीदेखील उपयाेगी पडणार नाही. - डाॅ. विनया चितळे, कान-नाक- घसा तज्ज्ञ

Web Title: The sound of the DJ was loud and deafening The rush to ear nose throat specialists increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.