खिडकीच्या काचेचा खळ्ळ आवाज; महिला घाबरली, खिडकीत अडकली गोळी
By विवेक भुसे | Published: February 21, 2024 09:11 AM2024-02-21T09:11:55+5:302024-02-21T09:12:13+5:30
डीआरडीओच्या सरावामधून एखादी गोळी चुकून आली असण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून घटनेचा तपास सुरु
पुणे/कोथरुड: भुसारी कॉलनीमधील राहुल टॉवर्स या डोंगरच्या शेजारी असलेली सोसायटी. सकाळी सव्वा अकरा वाजण्याची वेळ, एक महिला चौथ्या मजल्यावरील आपल्या घरात बसली होती. बाल्कनीला लागून असलेल्या खिडकीची काच खळ्ळ असा आवाज आला. या आवाजाने ही महिला घाबरली. तिने पाहिले तर एक खिडकीमध्ये एक गोळी अडकली होती.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त संभाजी कदम, कोथरुड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांचे फॉरेन्सिक पथकही तपासणीसाठी आले.
पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, राहुल टॉवर ही सोसायटी डोंगरालगत आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ)ची लॉग रेंज या सोसायटीपासून जवळ आले. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एका फ्लॅटच्या बाल्कनीला लागून असलेल्या खिडकीच्या काचेला एक गोळी धडकली आणि तेथेच अडकून राहिली. डीआरडीओच्या सरावामधून एखादी गोळी चुकून आली असण्याची शक्यता आहे. या घटनेचा तपास सुरु आहे.
यापूर्वी दोन तीनदा असा प्रकार घडला होता. काही महिन्यांपूर्वी मेट्रो स्टेशनचे काम सुरु असताना तेथील एका कामगाराला गोळी लागून तो जखमी झाला होता. त्यावेळी कोणतीतरी गोळी झाडल्याचा संशय सुरुवातीला व्यक्त केला जात होता. परंतु, त्यामागील नेमके कारण समजू शकले नव्हते.