राज्य मागासवर्ग आयोग मुख्यमंत्र्यांना सोमवारी अंतरिम अहवाल सादर करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 11:24 PM2022-02-04T23:24:48+5:302022-02-04T23:25:33+5:30
राज्य मागासवर्ग आयोगाचे सध्या अहवाल बनवण्याचे काम सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य मागासवर्ग आयोगाचे सध्या अहवाल बनवण्याचे काम सुरू आहे. शनिवारी आणि रविवारी तो पूर्ण होईल. त्यामुळे येत्या सोमवारी (दि. ७) रोजी हा अंतरिम अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे यांनी दिली.
राज्यातील १५ महापालिका, २७ जिल्हा परिषदांच्या आगामी काळात निवडणुका होणार आहेत. इंपेरिकल डेटा, इतर मागासवर्ग आरक्षण (ओबीसी आरक्षण) या सर्व बाबींच्या अनुषंगाने आयोगाचा हा अहवाल अत्यंत महत्वाचा आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामकाजा संदर्भात सुरू असलेल्या कामांबाबत आज झालेल्या बैठकीत वरील सर्व बाबींबाबत आढावा घेण्यात आला. अहवाल बनवण्याचे काम सुरु असून शक्यतो उद्या ते फायनल होईल. त्यामुळे येत्या सोमवारी हा अहवाल सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे प्रा. डॉ. काळे यांनी सांगितले.
आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे हे प्रकृती ठीक नसल्याने बैठकीला ऑनलाइन सहभागी झाले होते. इतर दहा सदस्यांपैकी काही जण पुणे कार्यालयात उपस्थित होते.