महिला, तरूणी बेपत्ता होण्याबाबत राज्य शासनाची कोणतीही भूमिका नाही; रुपाली चाकणकरांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 01:29 PM2022-10-23T13:29:49+5:302022-10-23T13:30:06+5:30
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने पाऊले उचलणे गरजेचे
बारामती : राज्यामध्ये सध्या मानवी तस्करीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामध्ये विशेष म्हणजे महिला व तरूणी बेपत्ता असण्याचे प्रमाण जास्त आहे. याबाबत आम्ही सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा करत आहोत. मात्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने पाऊले उचलणे गरजेच असताना याबाबत राज्य शासनाची कोणतिही भूमिका दिसत नाही, अशी टिका राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केली.
बारामती येथे रविवारी (दि. २३) त्यांनी माध्यमांशी बोलत होत्या. चाकणकर पुढे म्हणाल्या, राज्य महिला आयोगाच्या वतीने मानवी तस्करीबाबत सातत्याने राज्य शासनाकडे उपाययोजनांबाबत पाठपुरावा केला होता. यामध्ये समाधानाची बाब म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकारी राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात आले होते. त्यांनी याबाबत सकारात्मक चर्चा केली. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये याबाबत एक कृती कार्यक्रम ठरवू असा त्यांनी शब्द दिला आहे. कोरोना काळानंतर विधवा व एकल महिलांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पंडीता रमाबाई उद्योग प्रशिक्षण योजना महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पात मांडली होती. त्या योजनेच्या अनुदानाचा विषय या सरकारने पुढे चर्चेला घेतला गेला नाही. राज्य महिला आयोगाचे अनेक विषय आहे तसेच राहिले आहेत. याबाबत राज्य महिला आयोग सातत्याने पाठपुरावा करत आहे, असेही रूपाली चाकणकर यावेळी म्हणाल्या.