आमच्या छातीवरचा पाचशे वर्षांचा कलंक पुसला जाणार- देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 12:56 PM2024-01-06T12:56:58+5:302024-01-06T13:00:02+5:30
वाचाळवीरांनाही प्रभू राम सद्बुद्धी देतील, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला....
पिंपरी : आमच्या छातीवर पाचशे वर्षे असलेला कलंक आता पुसला जाणार आहे. अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे लोकार्पण होणार आहे. यादिवशी देशाला नवीन ओळख मिळणार आहे. रामराज्य होणे हेच आपले स्वप्न आहे. जसे छत्रपती शिवाजी महाराजांचे रयतेचे राज्य होते, तसेच रामराज्य तयार होईल. त्यातून वाचाळवीरांनाही प्रभू राम सद्बुद्धी देतील, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.
भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने तसेच महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि अटल चॅरिटेबल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ५ ते ७ जानेवारीदरम्यान ‘अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिरा’चे आयोजन नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर करण्यात आले आहे. या शिबिराला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
अयोध्येमध्ये २२ जानेवारीला श्रीराम मंदिराचे लोकार्पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘श्रीराम आम्हा बहुजनांचा होता. तो मांसाहारी होता’, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याबाबत फडणवीस म्हणाले, “काही लोकांना देशात एवढा पवित्र कार्यक्रम होतोय याचेही दुःख होत आहे. कालच एक वाचाळवीर बोलला की, प्रभू राम मांसाहारी होते. असे बेताल वक्तव्य करून नागरिकांच्या भावना दुखावण्याचे काम केले जाते. प्रभू श्रीराम देशातील करोडो लोकांचे श्रद्धास्थान आहे. त्यांच्याबद्दल असे बोलणाऱ्या वाचाळवीरांना प्रभू रामच सद्बुद्धी देतील. सद्य:स्थितीत संपूर्ण देशातील वातावरण ‘राममय’ झाले आहे. अशा पवित्र काळात हे जनहिताचे कार्य आम्ही पुढे नेत राहू.”
वाढत्या प्रदूषणाने आजारांत वाढ : तानाजी सावंत
शिबिराचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याहस्ते झाले. खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे उपस्थित होते. यावेळी सावंत म्हणाले, “हवा आणि जल प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाली आहे. अन्नधान्य उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांचा वापर केला जातो. त्यामुळे कर्करोगासारख्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. अशा गंभीर आजारांवर उपचार घेण्यासाठी अशी शिबिरे व्हावीत.”
पहिल्याच दिवशी दीड लाख रुग्णांची ऑनलाईन नोंद
शिबिरासाठी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीची सोय आहे. पहिल्याच दिवशी दीड लाख रुग्णांनी ऑनलाईन, तर ३० हजार रुग्णांनी ऑफलाईन नोंदणी केली. सायंकाळी पाचपर्यंत ६७ हजार नागरिकांची तपासणी झाली.