बाळाला स्तनपान करत असताना सुपरवायझर कक्षात घुसला; जहांगीर हॉस्पिटलमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 11:15 AM2022-07-13T11:15:16+5:302022-07-13T11:16:45+5:30
पुण्यातील प्रसिद्ध जहांगीर हॉस्पिटलमधली धक्कादायक घटना
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध जहांगीर हॉस्पिटलमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल असलेल्या एका महिलेचा रुग्णालयातीलच सुपरवायझरने विनयभंग केला आहे. ही महिला बाळाला स्तनपान करत असताना सुपरवायझर अचानक फिर्यादीच्या बेडचे कर्टन उघडून आत आला. अचानक घडलेल्या या प्रकाराने या महिलेला धक्का बसला.
एका 38 वर्षीय महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार जहांगीर हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या सुपरवायझर विरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 22 जून रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला या जहांगीर हॉस्पिटलमध्ये प्रसूतीनंतरचे उपचार घेत होत्या. जहांगीर हॉस्पिटलच्या फिमेल जनरल वार्ड मध्ये त्या दाखल होत्या. दरम्यान 26 जून च्या रात्री त्या बेडच्या बंद कर्टनमध्ये त्या बाळाला स्तनपान करत होत्या. त्याचवेळी हॉस्पिटलमध्ये काम करणारा सुपरवायझर अचानक त्या ठिकाणी आला. फिर्यादी यांच्या बेडचे कर्टन उघडून बाळाला स्तनपान करीत असताना त्याने समोरून पाहिले.
या सर्व प्रकाराने फिर्यादीचे स्त्री मनास लज्जा उत्पन्न झाली. त्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी याप्रकरणी तक्रार दिली. कोरेगाव पार्क पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. 'अशा आरोपांची रुग्णालयाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची आमच्या अंतर्गत तक्रार समिती अंतर्गत चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर योग्य कारवाई करण्यात येईल', असं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.