पुणे जिल्ह्यात डाेळ्यांची साथ ओसरेना! एकूण ५२ हजार रुग्णांचे निदान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 02:04 PM2023-08-17T14:04:24+5:302023-08-17T14:05:10+5:30
जुलै अखेरीस सुरू झालेली डाेळे येण्याची साथ अजूनही कमी हाेण्याचे नाव घेत नाही...
पुणे :पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण मिळून आतापर्यंत डाेळे येण्याच्या साथीचे एकूण ५२ हजार रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक म्हणजे यातील निम्मे, अर्थात २७ हजार रुग्ण बरे झाले आहेत. तर ग्रामीण भागात रुग्णसंख्या खूप कमी झाली आहे.
जुलै अखेरीस सुरू झालेली डाेळे येण्याची साथ अजूनही कमी हाेण्याचे नाव घेत नाही; मात्र त्याची तीव्रता कमी झाली आहे. बुधवारी दिवसभर पुणे शहरात महापालिकेच्या दवाखान्यांत ३८७, पिंपरी चिंचवडमध्ये २४३ आणि पुणे ग्रामीणमध्ये केवळ ६ असे एकूण मिळून ६३६ रुग्ण आढळले. अशा प्रकारे आतापर्यंत ३६ हजार रुग्ण आढळले आहेत. दैनंदिन सर्वेक्षणातून बुधवारी एकही रुग्ण आढळला नाही. तर एकूण १६ हजार ६३४ रुग्ण आढळले आहेत.
पुणे ग्रामीणमध्ये आतापर्यंत ३५ हजार, पिंपरी चिंचवडमध्ये साडेसात हजार आणि पुणे शहरात ९ हजार ७०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी शहरातील ६ हजार ६८७, पिंपरी चिंचवडमधील ६ हजार १० आणि ग्रामीणमधील १४ हजार ८९४ असे एकूण २७ हजार ५९१ रुग्ण बरे झाले आहेत. काही असे रुग्ण हाेते की त्यांना पुढील उपचारासाठी माेठ्या दवाखान्यांत दाखल करावे लागले. अशा रुग्णांची संख्या २१ आहे.