Pune Tasty Katta: तिखटावलेल्या जिभेला लोण्याची गोडी; पुण्यातील दक्षिण दावणगिरी लोणी स्पंज डोसा
By राजू इनामदार | Published: August 17, 2022 03:46 PM2022-08-17T15:46:51+5:302022-08-17T15:47:37+5:30
लोण्याच्या मुक्त वापरामुळे या पदार्थाला एक निराळीच चव
पुणे : कुठे लांब कर्नाटकातले एक गाव. दावणगिरी. तिथे तयार होणाऱ्या पदार्थाला महाराष्ट्रात इतका भाव मिळेल याची त्यांनाही कल्पना नसेल. डोसा, घावण, आपली आंबोळी यापेक्षा हे थोडे वेगळे प्रकरण आहे. तर्रीबाज खाऊन कंटाळलेल्यांसाठी हा एक चांगला उतारा आहे. लोण्याच्या मुक्त वापरामुळे या पदार्थाला एक निराळीच चव येते.
पीठ तयार करायची प्रक्रिया नेहमीच्या डोशासारखीच. रेशनिंगचाच तांदूळ वापरायचा. चांगला इंद्रायणी वगैरे वापरायला जाल तर फसाल. भिजवायचा, त्यात उडदाची डाळ, मेथीचे दाणे वगैरे टाकायचे. भिजवायचे, मिक्सरमधून काढायचे. झाले पीठ तयार. पितळेच्या, ॲल्युम्युनियमच्या भांड्यात ते कधीही ठेवायचे नाही. फक्त स्टिलच्या भांड्यात ते ठेवून द्यायचे. ८ ते १० तासांनंतर चांगले पीठ तयार होते. ते घोटवून घ्यायचे. झाले दावणगिरीसाठीचे पीठ तयार.
आता जवळ लोणी पाहिजे भरपूर. तवा तापला की त्याला लोणी लावायचे. त्यावर डावाने पीठ सोडायचे. वाटीने तो गोलसर व जाड करून घ्यायचे. गरम व्हायला लागले की त्याला चांगली जाळी पडू लागते. त्यावर लोणी लावायचे नाही तर टाकायचे. खरपूस वास यायला लागला की हवी असेल तर पलटी मारायची किंवा मग थेट डिशमध्ये. फोडणी दिलेली खोबऱ्याची चटणी, बटाट्याची सुकी व थोडी ओलसर अशी भाजी. याबरोबर हा प्रकार एकदम चविष्ट लागतो. गरम असतानाच खाणे चांगले.
रास्ता पेठेत अपोलो थिएटरसमोर काही वर्षांपूर्वी विनायक घोडके व ऋषिकेश कसवकर या युवकांनी एक गाडी सुरू केली. आज या ठिकाणी पिझ्झापासून ते पनीर कबाबपर्यंतची एक मोठी चौपाटीच सुरू झाली आहे. स्पंज डोशाची गाडी मात्र अजूनही जोरात सुरू आहे. आता या डोशाशिवाय तिथे अप्पे, मिल्कशेक असे प्रकारची मिळतात. आता तर पुण्यात कुठेही गेले तरी एखादी तरी दक्षिण दावणगिरीची पाटी दिसतेच, पण पीठ, लोणी हे पाहून घ्यायचे आणि मगच खाण्याची ऑर्डर द्यायची. तेवढी काळजी तर घ्यावीच लागते. तिखटजाळ खाऊन खाऊन जीभ हुळहुळी झालेली असते. म्हणजे भूक तर लागतेच, पण जिभेला थोडी तिखट लागू देत नाही. त्यावेळी हे दक्षिण दावणगिरी लोणी स्पंज डोसे कामाला येतात. पोटभर खाता येतात. त्रास कसलाच नाही. एका डिशमध्ये लहान लहान आकाराचे ३ डोसे मिळतात.
कुठे - रास्ता पेठेत व आता तर पुण्यात कुठेही
कधी - काही ठिकाणी दिवसभर तर काही ठिकाणी दुपारी ४ पासून रात्री उशिरापर्यंत
काय खाल - लोणी स्पंज डोसा. अप्पे