आयुकाने विकसित केलेल्या दुर्बिणीने टिपली सुर्याची पहिली छबी
By प्रशांत बिडवे | Published: December 8, 2023 10:45 PM2023-12-08T22:45:54+5:302023-12-08T22:50:17+5:30
हे यश भारतीय साैर माेहिमेतील मैलाचा दगड मानले जात असून सुर्यावरील वातावरण तसेच पृष्ठभागावर हाेत असलेल्या घडामाेडींचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांना नवी दिशा देणारे ठरणार असल्याचे बाेलले जात आहे.
पुणे : इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फाॅर अॅस्ट्राेनाॅमी अॅन्ड अॅस्ट्राेफिजिक्स (आययुका) मधील शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या अल्ट्राव्हायलेट इमेजिंग टेलिस्काेप (एसयुआयटी) दुर्बिणीने दि. ६ राेजी पूर्ण सुर्याची छबी टिपण्याची किमया केली आहे. हे यश भारतीय साैर माेहिमेतील मैलाचा दगड मानले जात असून सुर्यावरील वातावरण तसेच पृष्ठभागावर हाेत असलेल्या घडामाेडींचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांना नवी दिशा देणारे ठरणार असल्याचे बाेलले जात आहे.
आदित्य एल-१ हे अंतराळयान श्रीहरीकाेटा येथील सतिश धवन स्पेस सेंटर येथून २ सप्टेंबर राेजी सुर्याच्या दिशेने झेपावले हाेते. त्यावर आयुका येथील शास्त्रज्ञांच्या टीमने विकसित केलेले साेलार अल्ट्राव्हायलेट इमेजिंग टेलिस्काेप एसयुआयटी विकसित केलेली दुर्बिण बसविण्यात आली हाेती. दरम्यान, हे अंतराळयान नियाेजित सुर्य आणि पृथ्वीमधील एल-१ या ठिकाणी पाेहचण्यापूर्वीच दि. २० नाेव्हेंबर राेजी अंतराळ यानावर बसविलेल्या दुर्बिणींची टेस्टिंगला सुरूवात करण्यात आली हाेती. दरम्यान, दि. ६ डिसेंबर राेजी एसयुआयटी दुर्बिणीचे कव्हर उघडताच सुर्याची किरणे टिपत सुर्याची पूर्णाकृती छबी टिपली. त्यामध्ये साैरडाग तसेच चमकणारा भाग म्हणजेच प्लाज दिसून आले आहेत.
एसयुआयटी दुर्बिणीने अतिनिल सुर्यकिरणांमध्ये संपूर्ण सुर्याची चित्र टिपण्याची किमया करून दाखविली आहे. यापूर्वी आशा वातावरणात जगातील काेणत्याही टेलिस्काेप सुर्याचे संपूर्ण चित्र टिपले नव्हते. यापूर्वी इतर देशांनी पाठविलेल्या दुर्बिणींनी सुर्याच्या थाेड्या थाेड्या भागाचे चित्र एकत्रित करून सुर्याचे चित्र तयार केले हाेते. मात्र, आयुकाच्या दुर्बिणीला एकाच वेळी सुर्याचा संपूर्ण चेहरा टिपला आहे. साैरविज्ञान क्षेत्रातील एक अतुलनीय कामगिरी असल्याचे बाेलले जात आहे. आदित्य एल-१ यानावरील सर्व उपकरणांची तपासणी केली जात असून ते व्यवस्थितपणे कार्यरत आहेत. साधारणपणे पुढील एक महिन्यात आदित्य एल- १ हे कक्षेत फिरून नियाेजित ठिकाणी स्थिरावेल आणि त्यानंतर आणखी दर्जेदार फाेटाे पाठवतील. ज्याचा शास्त्रज्ञांना अभ्यासासाठी उपयाेग हाेणार आहे.
सर्यावरील लपलेल्या थरांचे अनावरण
एसयुआयटी दुर्बिणीवर ११ विशेष प्रकाश फिल्टर्स बसविले आहेत. त्यातील पहिल्या तीन फिल्टर्सचा वापर सुरू झाला असून सूर्याची पृष्ठभाग आणि वातावरणीय स्तराची उत्तम चित्रे काढली आहेत. अतिनिल किरणांच्या तरंगलांबीमध्येही सूर्याच्या फोटोस्फियर आणि क्रोमोस्फियर उच्च क्षमतेचे चित्रे पाठवू शकतात.
अवकाश दुर्बिणीची संकल्पना सुचणे आणि तीने पहिल्यांदा टिपलेले प्रकाश निरीक्षणे पाहणे ही वैज्ञानिकासाठी आयुष्यभराची संधी असते. अवकाशातील विशिष्ट वातावरणात पहिल्यांदाच एखाद्या अवकाश दुर्बिणीने याप्रकारे संपुर्ण सुर्य चित्रित केला आहे. सुर्याच्या मध्य आणि खालील भागाच्या वातावरणातील बारकावे टिपले आहेत. एसयुआयटी ने पाठविलेली माहिती सौर वातावरणाचा अभ्यासासाठी एक नवीन खिडकी उघडेल आणि आम्हाला सुर्यावरील घडामाेडींची अधिक तपशीलवार माहिती समजून घेण्यासाठी मदत करेल.
- प्रा. दुर्गेश त्रिपाठी, मुख्य विश्लेषक, एसयुआयटी