राज्यात १२ शहरांतील तापमान चाळिशी पार; अकोला ठरलेय सर्वांत उष्ण शहर; पारा ४२ अंशांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 12:52 PM2024-03-29T12:52:15+5:302024-03-29T12:52:34+5:30
राज्यातील पारा ४२ अंशांवर पोहोचलेला असून यंदा उन्हाळा तापदायक असेल, असा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
पुणे: शहरातील तापमानाचा किमान व कमालचा पारा चांगलाच वाढू लागला आहे. शहरातील काही दिवसांपूर्वी १५ अंशांवर असलेले किमान तापमान आता २० अंशांवर पोहोचले आहे. त्यामुळे शहरात रात्रीदेखील उकाडा जाणवत आहे. पुण्यात सर्वाधिक कमाल तापमान ३८.६ होते, तर राज्यात अकोल्यात गुरुवारी सर्वाधिक ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर चाळिशी पार केलेली १२ हून अधिक शहरे आहेत.
राज्यातील सर्वांत कमी किमान तापमान हे पुण्यात २०.९ अंशांवर नोंदले गेले. शहरात शिवाजीनगरमध्ये २०.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. सकाळपासूनच उकाडा जाणवत होता, दुपारी दुचाकीवरून जाताना अंगातून घाम निघत आहे. त्यामुळे पुणेकर चांगलेच हैराण झाले आहेत. राज्यातदेखील कमाल तापमान चाळिशी पार गेल्याने प्रचंड उकाडा जाणवत आहे. अजून उन्हाळ्याचे दोन महिने जायचे असून, आताच राज्यातील पारा ४२ अंशांवर पोहोचलेला आहे. यंदा उन्हाळा तापदायक असेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने १ मार्च रोजीच दिलेला होता.
राज्यात गुरुवारी पुन्हा अकोल्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांतील तापमान चाळिशी पार झालेले आहे. मराठवाड्यातदेखील परभणी, बीडमध्ये चाळिशी पार तापमान नोंदले गेले.
पुणेकर उकाड्याने हैराण
एकेकाळी पुणे हे थंड ठिकाण समजले जात होते. त्यासाठी ते प्रसिद्ध होते; पण वर्षभर आल्हाददायक असणारी हवा आता मात्र उष्ण झाली आहे. त्यामुळे रात्रीही पुणेकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
राज्यातील कमाल व किमान तापमान
पुणे - ३८.६ - २०.९
मालेगाव - ४१.२ - २४.६
सोलापूर - ४१.० - २७.०
परभणी -४१.६ - २४.४
बीड - ४०.४ - २५.५
अकोला - ४२.६ - २६.०
अमरावती - ४१.६ - २४.३
बुलढाणा - ४०.६ - २४.६
चंद्रपूर - ४१.२ - २२.२
नागपूर - ४०.२ - २२.४
वर्धा - ४१.५ - २४.४