राज्यातील तापमान यंदा चांगलेच तापदायक ठरणार; अनेक शहरांचा पारा चाळिशीपार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 12:29 PM2024-03-24T12:29:01+5:302024-03-24T12:29:17+5:30
दोन दिवसांपासून रात्री व दिवसाचेही तापमान वाढले असून, चांगलाच उकाडा जाणवतोय
पुणे: राज्यातील कमाल तापमानात गेल्या दोन दिवसांपासून वाढ झाली आहे. अनेक शहरांमधील तापमान चाळिशी पार गेले असून, अजून दोन महिने उन्हाळा सहन करायचा आहे. त्यामुळे राज्यातील तापमान यंदा चांगलेच तापदायक ठरणार आहे. आज मालेगावात सर्वाधिक कमाल तापमान ४०.६ नोंदले गेले, तर सर्वात कमी किमान तापमान नगरला १४.३ अंश सेल्सिअस होते.
सध्या उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. गेल्या चार दिवसांपासून राज्यातील हवामान कोरडे आहे आणि यापुढे देखील ते कोरडे राहणार आहे. दि.२८ ते रविवार ३१ मार्च दरम्यानच्या चार दिवसांपैकी (रंगपंचमी व नाथषट्ठी) फक्त एक-दोन दिवस विदर्भ, मराठवाड्यात केवळ ढगाळ वातावरणाची शक्यता जाणवेल, असे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
गुढीपाडवा झाल्यानंतर दोन दिवसांनी ते रामनवमीपर्यंत, मुंबईसह कोकण वगळता खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा, विदर्भातील फक्त काही भागात केवळ ढगाळ वातावरण राहील, तसेच किंचित तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. त्यामुळे घाबरू तर नयेच, शिवाय अजून तीन आठवडे हातात असून शक्य असल्यास शेतकऱ्यांनी शेतकामाचे त्या पद्धतीने नियोजन करावे, असेही खुळे यांनी सांगितले.
दि. २६ मार्च रोजी रात्री नवीन पश्चिमी झंजावात, अतिउत्तर भारतातील पश्चिमी हिमालयीन राज्यात प्रवेश करणार असून तेथे पाऊस, बर्फवृष्टी व थंडी जाणवेल. परिणामी महाराष्ट्रातही मुंबईसह कोकण व मध्य महाराष्ट्रातील कमाल किमान तापमाने सरासरी इतकी तर काही ठिकाणी सरासरीच्या खाली येण्याची शक्यता जाणवत आहे. - माणिकराव खुळे, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ
राज्यातील कमाल व किमान तापमान
पुणे - ३७.७ - १७.५
जळगाव - ३९.७ - १९.०
मालेगाव - ४०.५ - १९.२
सांगली - ३८.० - २२.८
सोलापूर - ३९.७ - २४.५
मुंबई - ३१.० - २३.२
परभणी - ३९.१ - २१.७
बीड - ३८.५ - २१.०
अकोला - ४०.४ - १९.९
यवतमाळ - ४०.५ - २०.७
पुणेकरांना चटका
पुण्यात दोन दिवसांपासून रात्री व दिवसाचेही तापमान वाढले असून, चांगलाच उकाडा जाणवत आहे. दुपारी चटकाही सहन करावा लागत आहे. किमान तापमान १७.५ तर कमाल तापमान ३७.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.