Pune Temperature: तापमानाचा पारा हळूहळू चढतोय; पुणेकर चांगलेच हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 09:42 AM2024-04-02T09:42:23+5:302024-04-02T09:43:11+5:30
येत्या आठवड्यात १ ते २ अंशाने कमाल तापमानात वाढ होईल, हवामान विभागाचा अंदाज
पुणे: शहरातील कमाल तापमानाचा पारा हळूहळू चढू लागला आहे. साेमवारी (दि. १) शिवाजीनगरचे तापमान ३९.६; तर कोरेगाव पार्क, मगरपट्टा, वडगावशेरीचे तापमान चाळीशी पार गेल्याची नोंद झाली आहे. यामुळे पुणेकर चांगलेच हैराण झाले आहेत. जिल्ह्यात शिरूरचे सर्वाधिक कमाल तापमान ४१.८ अंश नोंदले गेले.
येत्या दोन-तीन दिवसात हवामान कोरडे राहणार असून, तापमानाचा पाराही वाढणार आहे. येत्या आठवड्यात १ ते २ अंशाने कमाल तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पुण्यातील बहुतांश भागातील तापमान चाळीशीत पोहोचले आहे. दुपारी पुणेकरांना उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. जिल्ह्यातील तापमानही चांगलेच तापले आहे. शिरूरला तापमान ४१.८ अंशावर पोहोचले; तर पुरंदर, राजगुरूनगर, खेड, चिंचवड येथील तापमान चाळीशीमध्ये होते.
शहरातील कमाल तापमान
शिरूर : ४१.८
कोरेगाव पार्क : ४१.४
वडगावशेरी : ४०.९
राजगुरूनगर : ४०.७
मगरपट्टा : ४०.४
खेड : ४०.२
चिंचवड : ४०.२
हडपसर : ३९.९
शिवाजीनगर : ३९.६
बारामती : ३८.२