राज्यात तापमानाचा पारा चढत राहणार; विदर्भामध्ये वादळी पावसाचा इशारा
By श्रीकिशन काळे | Published: April 14, 2024 05:04 PM2024-04-14T17:04:20+5:302024-04-14T17:04:41+5:30
हवेतील उष्णता कायम असून, कमाल तापमान काही प्रमाणात चाळीशीच्या जवळपास नोंदवले जात आहे
पुणे: राज्यातील विदर्भासह मराठवाड्यात कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. दोन दिवसांपासून वादळी पाऊस आणि गारपिटीचा फटका दोन्ही विभागात बसत आहे. आज (दि.१४) देखील विदर्भामध्ये वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. इतर ठिकाणी तापमानाचा पारा चढताच राहणार असल्याने नागरिकांना उन्हाचा चटका सहन करावा लागणार आहे.
सध्या उत्तर गुजरात आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती अद्याप कायम आहे. उत्तर ओडिशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. केरळ, कर्नाटक ते कोकणपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे विदर्भात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. राज्यामध्ये विदर्भात वादळी वारे आणि विजांसह पाऊस होईल, त्यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवेतील उष्णता कायम असून, कमाल तापमान काही प्रमाणात चाळीशीच्या जवळपास नोंदवले जात आहे. परंतु, उकाडा चांगलाच जाणवत आहे.
पुणे शहरातील आकाश निरभ्र असून, दुपारी उष्णतेचा चटका बसत आहे. कमाल तापमानाचा पारा हा ३९ अंशावर नोंदविला जात असून, आज किमान तापमान शिवाजीनगर येथे १८.१ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.