पुणेकरांचे टेन्शन वाढले; आता रिक्षा प्रवासही महागला
By राजू इनामदार | Published: July 25, 2022 07:00 PM2022-07-25T19:00:40+5:302022-07-25T19:00:54+5:30
प्रवाशांना पहिल्या १ किलोमीटरसाठी १५ रूपये तर पहिल्या दीड किलोमीटरसाठी २३ रूपये द्यावे लागतील
पुणे : स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल, खाण्याचे पदार्थ याबरोबरच आता शहरातील रिक्षा प्रवासही महागला आहे. आता प्रवाशांना पहिल्या १ किलोमीटरसाठी १५ रूपये तर पहिल्या दीड किलोमीटरसाठी २३ रूपये द्यावे लागतील. याआधी हा दर १४ व २१ रूपये असा होता.
सीएनजी गॅसच्या दरात मागील काही महिन्यांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता ही दरवाढ कमी असल्याची टीका रिक्षा संघटनांनी केली आहे. रिक्षा पंचायतीने मीटरमध्ये वाढ करण्याचे अंशत: स्वागत करत असल्याचे म्हटले आहे तर आम आदमी रिक्षा संघटनेचे श्रीकांत आचार्य यांनी ही दरवाढ खटुआ समितीच्या अहवालानुसार आहे किंवा नाही याचा अभ्यास करून नंतर मागणी करू असे मत व्यक्त केले. बघतोय रिक्षावाला संघटनेचे डॉ. केशव क्षीरसागर यांनी या दरवाढीचे स्वागत केले व रिक्षाचालकांना सीएनजी गॅसवर अनुदान द्यावे अशी मागणी केली.
सीएनजी गॅसच्या दरात ६० रूपयांवरून ८५ रूपयांपर्यंत वाढ झाली तेव्हापासून रिक्षा संघटनांकडून दरवाढीची मागणी होत होती. मात्र जिल्हा वाहतूक प्राधिकरणाकडून त्यावर निर्णयच होत नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा व अन्य काही कारणे सांगून प्राधिकरण यावर निर्णय घेणे टाळत होते. रिक्षा पंचायतीने अभंग दिंडी, पावसात आंदोलन असे केल्यानंतरही आश्वासनेच दिली जात होती. अखेर रिक्षा संघटनांनी आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिल्यावर प्राधिकरणाने दरवाढ जाहीर केले.
रिक्षा तसेच टॅक्सी यांच्या भाडेदरात वाढ करण्यासाठी खटुआ समितीने काही निकष तयार केले आहेत. इंधन दर, किलोमीटर यांची तुलना करून दरवाढीचे कोष्टक करण्यात आले आहे. प्राधिकरणाने आता जाहीर केलेली दरवाढ त्या कोष्टकाला धरून नाही असा आरोप रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांनी केला. तरीही पंचायत या दरवाढीचे स्वागत करत असून खटुआ समितीच्या निकषांनुसार दरवाढ निश्चित करण्याची मागणी करत आहे असे पवार यांनी सांगितले.