रणरागिणी शब्दाचा राजकारण्यांनी चोथा केलाय - शरद पोंक्षे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 02:44 PM2022-11-06T14:44:21+5:302022-11-06T14:44:41+5:30
सध्या सर्वच भयंकर झालंय त्यामुळे दुर्गा शब्द सर्वात जास्त योग्य
पुणे : सध्या राजकारणी लोकांनी रणरागिणी हा शब्द बदनाम केला आहे. शेफाली वैद्य यांच्यासाठी हा शब्द वापरणार होतो. राजकारण्यांनी या शब्दाचा पार चोथा केला आहे. त्यामुळे आज रणरागिणी शब्द टाळतोय. शेफाली या दुर्गा आहेत, तोच शब्द त्यांच्यासाठी योग्य आहे, असे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी सांगितले. इंद्रायणीसाहित्यतर्फे लेखिका शेफाली वैद्य यांच्या 'नित्य नूतन हिंडावे' आणि'चितरंगी रे' या दोन पुस्तकांचे प्रकाशन रविवारी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी पोंक्षे बोलत होते.
पोंक्षे म्हणाले, मी आज पहिल्यांदा शेफाली वैद्य यांना भेटतोय. धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेम यातून आमची ओळख आहे. त्यांच्यासाठी रणरागिणी शब्द वापरायचे मी टाळतो. कारण राजकारण्यांनी शब्दांचा चौथा केलाय. सध्या सर्वच भयंकर आहे. त्यांना दुर्गा सर्वात जास्त योग्य आहे.
रावत म्हणाले, समाजात किती प्रकारची माणसं आहेत. त्यांचे अनुभव वेगळे असतात. ते समजून वेगळ्या प्रकारचे पर्यटन करायला हवे. पूर्वी फिरल्यास भटकभवानी म्हणायचे. पण आज शेफाली यांच्यासारखी भटकंती ही आगळीवेगळी आहे. त्यातून मनुष्य समृद्ध होतो. मनोरंजन हा भाग असतोच. आपण भौतिकदृष्टया समृद्ध होतो, तसे नैतिकदृष्ट्या समृद्ध व्हायला हवे.
''शेफाली तुम्ही लढाऊ आहात. तुम्हाला कधी कुठेही गरज लागली तर आम्हाला सांगा. माझ्या राजकीय ओळखी आहेत. तशी तुम्हाला गरज लागत नाही. कारण राज्यपालच तुमच्या ओळखीचे आहेत. पण आम्हा सैनिकांची गरज लागली तर नक्की सांगा. - शरद पोंक्षे''