राहूत बिबट्याची दहशत कायम! हल्ल्यात दोन कालवडी ठार, पाटेठाण येथे बिबट्या जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 12:07 IST2025-01-01T12:07:13+5:302025-01-01T12:07:13+5:30
राहू - येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन कालवडी ठार झाल्या आहेत. तर पाटेठाण येथे एका बिबट्याला ...

राहूत बिबट्याची दहशत कायम! हल्ल्यात दोन कालवडी ठार, पाटेठाण येथे बिबट्या जेरबंद
राहू - येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन कालवडी ठार झाल्या आहेत. तर पाटेठाण येथे एका बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
राहू येथील बागवस्तीमध्ये मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास तेजस शिंदे यांच्या जनावरांच्या गोठ्यात बिबट्याने हल्ला करून एक कालवड ठार केली. याचबरोबर देविका लॉन्स मंगल कार्यालयाच्या नजीक लोकवस्तीमध्ये योगेश शांताराम नवले यांच्या गोठ्यातील कालवडीचा फडशा पाडल्याची घटना घडली.
दरम्यान, पाटेठाण येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास एक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. नागरिकांना बिबट्यांचे वारंवार दर्शन होत असून बिबट्यांची संख्या नेमकी किती आहे, याबाबत वनविभागालाही अद्याप निश्चित माहिती नाही. मात्र, या भागातील बिबट्यांची संख्या शंभराहून अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गेल्या पंधरा दिवसांत तीन बिबट्यांना पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. दौंड तालुका वनाधिकारी राहुल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडल अधिकारी अंकुश थोरात, राहू येथील वनरक्षक गणेश मस्के, वनसेवक सुरेश पवार, भानुदास कोळपे, दत्तात्रय खोमणे, तेजस ठाकर आणि गणेश चौधरी यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिश्रम घेतले.