जुगाराच्या नादासाठी चक्क लॅपटॉपची चोरी; महाविद्यालयांच्या वसतीगृहातून लॅपटाॅप चोरणारा गजाआड
By नितीश गोवंडे | Published: October 25, 2023 05:10 PM2023-10-25T17:10:11+5:302023-10-25T17:10:24+5:30
लॅपटाॅप चोरीचे १८ गुन्हे उघडकीस आले असून, २८ लॅपटाॅप, एक टॅब आणि मोबाइल संच असा दहा लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुणे: शहरातील विविध महाविद्यालयांच्या वसतीगृहात शिरुन लॅपटाॅप चोरणाऱ्या चोरट्याला लोणीकंद पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून लॅपटाॅप चोरीचे १८ गुन्हे उघडकीस आले असून, २८ लॅपटाॅप, एक टॅब आणि मोबाइल संच असा दहा लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निलेश प्रफुलचंद्र कर्नावट (३९, रा. नांद्रा, ता. पाचोरा, जि. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.
नगर रस्त्यावरील वाघोली भागातील एका महाविद्यालयाच्या वसतीगृहात विद्यार्थ्यांचे लॅपटाॅप चोरीला गेला होते. या गुन्ह्याचा तपास लोणीकंद पोलिसांकडून करण्यात येत होता. दरम्यान, तपास पथकातील पोलिस कर्मचारी अजित फरांदे यांना या प्रकरणातील संशयित कर्नावट हा वाघोली येथील रायसोनी महाविद्यालयाजवळ थांबल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी सापळा रचून पकडले.
तपासात त्याने शहरातील विविध महाविद्यालयांच्या वसतीगृहातून लॅपटाॅप चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून २८ लॅपटाॅप, एक टॅब जप्त करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, पोलिस निरीक्षक मारुती पाटील, सहायक निरीक्षक गजानन जाधव, रवींद्र गोडसे, बाळासाहेब सकाटे, संदीप तिकोणे, अजय फरांदे, सागर जगताप, विनायक साळवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
आरोपी कर्नावटने रायसोनी काॅलेज, सिंहगड काॅलेज, सिंबायोसिस काॅलेज, एमआयटी काॅलेज, तसेच वारजे, देहू, बिबवेवाडी, लोणावळा परिसरातून लॅपटाॅप चोरल्याचे तपासात उघडकीस आले आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक काइंगडे यांनी दिली.
लॅपटाॅप विक्री करून खेळायचा जुगार..
कर्नावट हा फिरस्ता आहे. त्याला जुगाराचे व्यसन आहे. चोरीचे लॅपटाॅप दोन-तीन हजार रुपयात तो विक्री करत होता. शनिवारी आणि रविवारी प्रामुख्याने तो ह्या चोऱ्या करत होता. दिवसभर हाॅस्टेल परिसरातील रेकी करून ज्या खोलीचा दरवाजा उघडा असेल तेथे तो शिरत होता. त्यानंतर लॅपटाॅप चोरी करत असे. पुढे ते लॅपटाॅप रस्त्यावरील व्यक्तींना विक्री करत होता. मात्र ही पद्धत पोलिसांच्या लक्षात येताच तो जाळ्यात अडकला.