पोलीस ठरले चोरावर मोर; रंगपंचमीचा गैरफायदा घेऊन सोन्याचा हार चोरणाऱ्याला ठोकल्या बेड्या
By विवेक भुसे | Published: March 13, 2023 03:12 PM2023-03-13T15:12:14+5:302023-03-13T15:12:25+5:30
आजींच्या गालाला बळच रंग लावून त्यांच्या गळ्यातील ८० हजारांचा २ तोळे सोन्याचा हार जबरदस्तीने हिसकावला
पुणे : रंगपंचमीचा गैरफायदा घेऊन चोरट्याने स्वत:च्या चेहऱ्याला रंग लावला अन रस्त्याने जाणाऱ्या एका ७२ वर्षाच्या आजींना रंग लावून त्यांच्या गळ्यातील ८० हजार रुपयाचा सोन्याचा हार हिसकावून नेला. आजींना लावलेल्या रंगावरुनच पोलीस काही तासात या चोरट्यापर्यंत पोहचले आणि त्याला अटक केली.
विक्रम माणिक पारखे (वय २१, रा. बालाजीनगर) असे या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी धनकवडीत राहणाऱ्या एका ७२ वर्षांच्या ज्येष्ठ महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना धनकवडीतील चैतन्यनगरमधील वसंत विहार बिल्डिंगजवळ रविवारी सकाळी पावणेनऊ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रंगपंचमी असल्याने अनेक जण रंग खेळत होते. त्याचा गैरफायदा घेण्याचे आरोपीने ठरविले. आपली ओळख लपविण्यासाठी स्वत:च्या चेहऱ्याला रंग लावला. फिर्यादी या सकाळीच रस्त्याने चालत जात होत्या. आरोपी हा त्यांच्या दिशेने आला. त्यांच्या गालाला बळेच रंग लावला. त्याचवेळी त्यांच्या गळ्यातील ८० हजार रुपयांचा २ तोळ्यांचा सोन्याचा हार जबरदस्तीने हिसका मारुन चोरुन नेला. आजींनी तातडीने हा प्रकार पोलिसांना कळविला. सहकारनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहचले. आजींच्या गालाला रंग लागला होता. तोच पुरावा घेऊन पोलिसांनी असा रंग लावलेल्या मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. परिसरातील सीसीटीव्ही तपासले. परिसरात अनेकांकडे चौकशी केली. त्यातून काही तासात विक्रम पारखे याला पकडले. त्यांच्याकडून चोरलेला सोन्याचा हार जप्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे तपास करीत आहेत.