एकाला वाचवण्यासाठी गेलेल्या तिघांनी गमावला जीव; शौचालयाच्या टाकीत पडल्याने चौघांचा गुदमरून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 04:09 PM2022-03-02T16:09:32+5:302022-03-02T16:10:32+5:30
पुणे सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती हद्दीतील एका इमारतीच्या शौचालयाची टाकी साफ करण्यासाठी उतरलेल्या तीन कामगार व त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या एक नागरिकाचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला
पुणे/कदमवाकवस्ती : पुणे सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती हद्दीतील एका इमारतीच्या शौचालयाची टाकी साफ करण्यासाठी उतरलेल्या तीन कामगार व त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या एक नागरिकाचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. ही दुर्दैवी घटना बुधवारी(ता.०२)सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.
या घटनेत सिकंदर उर्फ दादा पोपट कसबे(वय -४५)रा.पाण्याची टाकी संभाजीनगर, कदमवाकवस्ती,ता. हवेली),पद्माकर मारुती वाघमारे(वय-४३, पठारे वस्ती),कृष्णा दत्ता जाधव(वय-२६ रा. देशमुख वस्ती, देगाव,ता.उत्तर सोलापूर,सोलापूर),रुपचंद उर्फ सुवर्ण नवनाथ कांबळे,(वय-४५,रा.सध्या घोरपडेवस्ती,कदमवाकवस्ती)हे चार जण मृत्युमुखी पडले. या घटनेची माहिती मिळताच,परिमंडळ ५ पोलीस उपआयुक्त नम्रता पाटील त्यांचे सहकारी आणि अग्निशमन दलाचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
याबाबतीत सविस्तर वृत्त असे की,पुणे-सोलापुर महमार्गालगत कदमवाकवस्ती(ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील प्यासा हॉटेलच्या पाठीमागे राजेंद्र जयसिंग काळभोर यांच्या मालकिची जय मल्हार कृपा नावाची इमारत आहे. या इमारतीमधील ड्रेनेजचे काम रुपेश उर्फ सुवर्ण कांबळे व सिकंदर उर्फ दादा कसबे यांना दिले होते. बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास टाकीच्या साफसफाईचे काम सुरु असताना, वरील चौघांच्या पैकी कृष्णा जाधव शौचालयाच्या टाकीत पाईप सरकवत असताना तोल जावून टाकीत पडले. कृष्णा जाधव यांना वाचवण्यासाठी टाकीच्या तोंडावर आलेले दादा कसबेही टाकीत पडले. दरम्यान दोन सहकारी टाकीत पडल्याचे लक्षात येताच, त्या दोघांना वाचवण्यासाठी ठेकेदार रुपेश उर्फ सुवर्ण कांबळे टाकीत उतरले. तोही टाकीत गुदमरून पडला.
पंधरा मिनीटाहुन अधिक काळ टाकीतुन कोणीही बाहेर येत नसल्याचे पाहुन टाकीच्या शेजारच्या खोलीत राहणारे भाडेकरु पद्माकर वाघमारे यांनीही टाकीच्या तोंडाकडे धाव घेतली. मात्र तेही पाय घसरुन टाकीत पडले. टाकीत मोठ्या प्रमाणात घाण व गॅस असल्याने वरील चौघांचाही मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेच्या मदत कार्यात कदमवाकवस्ती परिसरातील दत्तात्रय अंबुरे, नितीन लोखंडे, राम भंडारी, रणजित माने यांनी मोलाची भूमिका निभावली.