पुणे विद्यापीठ चौकातील वाहतुककोंडी मुक्तीला उजाडणार 'जानेवारी २०२५'
By निलेश राऊत | Published: August 29, 2022 05:09 PM2022-08-29T17:09:17+5:302022-08-29T17:16:41+5:30
विद्यापीठ रस्त्यावर दुहेरी उड्डाणपूलासाठी २७७ कोटी रूपये खर्च येणार असून, टाटा प्रोजेक्ट कपंनीकडून तो उभारण्यात येत आहे
पुणे : शहरात सर्वात गहन प्रश्न बनलेल्या पुणे विद्यापीठ रस्त्यावरील (गणेशखिंड रस्ता) वाहतुक कोंडीतून पूर्णत: मुक्तता होण्यासाठी व पीएमआरडीएने केेलेल्या दाव्यानुसार येथील वाहतुक सुलभ होण्यासाठी जानेवारी, २०२५ पर्यंत नागरिकांना वाट पहावी लागणार आहे.
औंध, बाणेर, पाषाणकडून येणारी वाहतुक व पुण्यातून या दिशेने जाणारी वाहतुकीला सध्याला हा रस्ता नरकयातना देणारा ठरला आहे. अद्याप याठिकाणी केवळ मेट्रो पिलरचे काम सुरू असताना दहा ते पंधरा मिनिटाच्या प्रवासाला तब्बल दीड दोन तास लागत आहेत. परंतु, नित्याच्या या वाहतुक कोंडीतून तुर्तास तरी मुक्तता मिळणार नसल्याने सोमवारी पीएमआरडीने पत्रकार परिषदेत केलेल्या सादरीकरणातून स्पष्ट झाले आहे. उलट पुणे विद्यापीठ चौकात उड्डाणपूलाचे काम सुरू झाल्यावर या वाहतुक कोडींत आणखी भर पडण्याची दाट शक्यता आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) कोरोनाच्या पहिल्या लाटेतील लॉकडाऊनमध्ये याठिकाणी असलेला उड्डाणपूल पाडून नव्याने मेट्रोसह दुमजली पुलाच्या उभारणीसाठी पायाभरणी करण्यात आली. सर्वात वरच्या स्तरावरून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्ग, त्याखाली वाहनांसाठी पुल व त्याखाली ४५ मीटरचा रस्ता अशा दुहेरी उड्डाणपूलाचे नियोजन करण्यात आले आहे. २५ नोव्हेंबर, २०२१ पासून या मेट्रो मार्गाचे काम सुरू झाले असून, १ एप्रिल २०२५ नंतर या मार्गावरून प्रत्यक्ष मेट्रो धावणार आहे.
चार भूयारी मार्ग महापालिका साकारणार
औंध, पाषाण, औंधकडे जाणाऱ्या या दुहेरी उड्डाणपूलासह महापालिकेकडून या मार्गावर विद्यापीठ चौकातून औंधकडे जाण्यासाठी भूयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. या भूयारी मार्गासह महापालिका या रस्त्यावरील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी राधेकृष्ण रस्ता, संचेती चौक व अभिमान श्री (पाषाण रस्ता -सकाळनगर यांना जोडणाऱ्या रस्त्यावर) वळण येथे एक असे चार भूयारी मार्ग करणार आहे. पीएमआरडीएकडून होणाऱ्या उड्डाणपूलाच्या कामासह महापालिकेने हे कामही समांतर करण्याचे नियोजन केले असून, ही दोन्ही कामे सोबत झाली तर ती जानेवारी २०२५ पर्यंत पूर्ण होतील. असा विश्वास महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी यावेळी दिली.
दुहेरी उड्डाणपूलासाठी २७७ कोटी रूपये खर्च येणार
विद्यापीठ रस्त्यावर दुहेरी उड्डाणपूलासाठी २७७ कोटी रूपये खर्च येणार असून, टाटा प्रोजेक्ट कपंनीकडून तो उभारण्यात येत आहे. या दुहेरी उड्डाणपूलाची लांबी ८८१ मीटर इतकी राहणार असून विद्यापीठ चौकात येईपर्यंत तो १३० मीटर अंतरापर्यंत सहा पदरी (लेन) राहणार आहे. या पूलावरून औंधकडे जाण्यासाठी २६० मीटरच्या दोन लेन, बाणेर रस्त्याकरिता १४० मीटरच्या चार लेन व पाषाण रस्त्याकरिता १३५ मीटरच्या दोन लेन असणार आहेत. उड्डाणपूलाखालील ४५ मीटर रूंदीच्या रस्त्यावर जागोजागी वळण्यासाठी सेनापती बापट रस्त्याकडे जाण्यासाठी विना सिग्नल मार्गिका असणार असून, येथे जागोजागी ग्रेड सेपरेटचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल यांनी दिली.
कामावर नियंत्रण कोणाचे ?
महापालिकेने उभारलेला पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पीएमआरडीएने मेट्रो मार्गिकेसह दुहेरी उड्डाणपूल करण्यासाठी जमीनदोस्त केला. २०२० मध्ये तो जमीनदोस्त झाला. पण दुहेरी उड्डाणपूलासह मेट्रो पुलाच्या पीलर उभारणी सुरू होण्यासाठी दोन वर्षाचा काळ लोटला. यावर्षी या कामाने जोर धरला असला तरी पावसाळ्यात या रस्त्याचे तीन तेरा झाले आहेत. महापालिकेकडे या रस्त्याच्या दुरूस्तीबाबत विचारणा केला असता ऐन पाऊस काळात आता या रस्त्याची जबाबदारी आमची नाही आम्ही तो पीएमआरडीएकडे दिला आहे असे सांगून हात वर केले होते. आता या रस्त्यावर पीएमआरडीए व महापालिका या दोघांकडून अनुक्रमे उड्डाणपूल व भूयारी मार्गाचे काम केले जाणार आहे. यामुळे या कामांमध्ये समन्वय साधण्यासाठी सर्व कामांवर नियंत्रण कोणाचे असेल हा प्रश्न निर्माण झाला आहे.
तीन लाख लोक ये-जा करतात
पुणे विद्यापीठ चौकातून पुण्याकडून बाणेर, पाषाण, औंधमार्गे पुढे जाणारे व याच मार्गावरून पुणे शहरात येणाऱ्यांच्या रोजची संख्या ही साधारणत: तीन लाख इतकी आहे. या रस्त्यावर दुहेरी उड्डाणपूलासह हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सुरू झाल्यावर यापैकी ३० टक्के नागरिक हे मेट्रोने प्रवास करतील असा विश्वास पीएमआरडीएने केला आहे. विद्यापीठ चौकातील मेट्रो स्टॉप (थांबा ) हा बाणेर रस्त्यावर राहणार असून, येथून विद्यापीठात तसेच मॅार्डन महाविद्यालयाच्या दिशेने जाण्यायेण्यासाठी मार्ग राहणार आहे. तसेच मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाच्या वाहनांच्या पार्किंगसाठी ग्रामीण पोलीस मुख्यालयाची जागा घेण्यात आली आहे.