भरगाव वेगात येणाऱ्या ऊसाच्या ट्रॉलीचा अपघात; मुळ्या अंगावर पडून दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू, इंदापूरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 05:55 PM2022-03-27T17:55:03+5:302022-03-27T17:55:43+5:30
ऊसाने भरलेला ट्रॅक्टर वाहतुकीचे नियम मोडून भरगाव वेगात येत होता
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील शहाजीनगर येथे ऊस वाहतुक चालकाने भरगाव वेगात ट्रॅक्टर चालवल्याने घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली असून याबाबतची फिर्याद संजय मधुकर फडतरे(वय२६)रा.बोराटवाडी,ता.इंदापूर,जि.पूणे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दिली आह नारायण रामचंद्र जाधव (रा.बोराटवाडी ता.इंदापूर, जि.पूणे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व नारायण जाधव हे दोघेजण निरा भिमा कारखाना येथुन दुचाकीवरून सायंकाळचे सुमारास बोराटवाडी गावाकडे जात होते. त्यावेळी नारायण हे दुचाकी चालवत होते. तर फिर्यादी हे पाठीमागे बसले होते. शहाजीनगर येथुन ८०० मीटर अंतरावर रेडा रोडवर समोरून ऊसाने भरलेला ट्रॅक्टर वाहतुकीचे नियम मोडून भरगाव वेगात येत होता. त्याला पाठीमागे जोडलेल्या ट्राॅलीच्या टायर बाहेर निघून, ऊसाचा ट्रेलर पिळला जाऊन ट्रालीतील ऊस दुचाकी चालकाच्या अंगावर पडला. दुचाकीचालक नारायण जाधव यांच्या अंगावर ऊस मोळ्या पडल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यावेळी रस्त्याकडेला असलेल्या लोकांनी जाधव यांचे अंगावर पडलेल्या मोळ्या काढून त्यांना पुढील उपचारार्थ उपजिल्हा रूग्णांलय अकलुज येथे दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाधव यांना मृत घोषित केले.