इंदापूरात सीआयडी असल्याचे सांगून ट्रकचालकाला ४६ हजारांना लुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 05:47 PM2022-02-08T17:47:23+5:302022-02-08T17:47:37+5:30
दोन वाहनात अफीम सापडल्याने तुमच्याही गाडीची तपासणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले
बाभुळगाव (ता.इंदापूर) : निमगाव केतकी (ता.इंदापूर) गावचे हद्दीत रात्रीच्या वेळी ट्रक अडवून सी आय डी पोलीस असल्याचे सांगत ट्रकचालकाला ४६ हजारांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ६ फेब्रुवारी २०२२ रोजी रात्री पावणे एकच्या सुमारास घडली असल्याची माहिती इंदापूर पोलिसांनी दिली आहे. हेमराज जगनाथ गुजर (वय २५, रा.कंनकरिया ता.झावपाटण,जि.झालावाड, राजस्थान) यांनी दोन अनोळखी इसमाविरूद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दीली आहे.
गुजर हे राजस्थान येथून कोळसा माल भरून सातारा येथे तो खाली करण्यासाठी गेले होते. त्यांनी सातारा येथे गाडीतील कोळसा खाली केला. व भाड्याचे रोख ४६ हजार रूपये घेऊन ते परत राजस्थानला निघाले होते. निमगाव केतकी गावच्या हद्दीत दोन अज्ञात इसमांनी सी आयडी पोलीस असल्याचे सांगून तपासणीसाठी गाडी थांबवण्यास सांगितले. दोन वाहनात अफीम सापडल्याने तुमच्याही गाडीची तपासणी करणार असल्याचे ते म्हणाले. व गाडी तपासनीस सुरुवात केली. गाडीच्या टुलबाॅक्समध्ये ड्रायव्हरने ठेवलेली ४६ हजार रूपयांची रक्कम फसवणुक करून घेऊन गेले. असे इंदापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले असुन पुढील तपास पो.स.ई. दत्तात्रय लिगाडे हे करत आहेत.