रस्त्याच्या कडेला बोलत असताना ट्रकने दिली धडक; अपघातात मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू, ट्रकचालक फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 11:30 AM2022-05-16T11:30:37+5:302022-05-16T11:31:18+5:30
टाकळी हाजी : येथील टाकळी हाजी - फाकटे या रोडवर अपघात होऊन या अपघातात जिजाबाई केरूभाऊ पळसकर (वय ५२ ...
टाकळी हाजी : येथील टाकळी हाजी - फाकटे या रोडवर अपघात होऊन या अपघातात जिजाबाई केरूभाऊ पळसकर (वय ५२ वर्षे), ताराबाई महादु साबळे (वय ७३ वर्षे ) आई व मुलगी यांचा मृत्यू, तर विलास महादू साबळे (वय ४७ वर्षे) हे गंभीर जखमी झाले आहेत.
टाकळी हाजी येथील विलास महादू साबळे व त्यांची आई ताराबाई महादू साबळे हे टाकळी हाजी येथून मोटर सायकलवर साबळेवाडीकडे जात असताना फाकटे रोडवर विलास यांची बहीण जिजाबाई केरभाऊ पळसकर रस्त्याने पायी चाललेली होती. तिला पाहिल्यानंतर विलास यांनी रस्त्याच्या कडेला गाडी थांबविली. विलास यांची आई ताराबाई व बहीण जिजाबाई या रस्त्याच्या कडेला दोघी बोलत असताना पाठीमागून ट्रक आला व भरधाव ट्रकने या दोघींना व विलास बसलेला असलेल्या मोटरसायकलला धडक दिल्याने अपघात झाला. जिजाबाई यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर ताराबाई या गंभीर झाल्या होत्या. या अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे. स्थानिकांनी ताराबाई व विलास यांना तातडीची मदत करत दवाखान्यात हलविले. ताराबाई यांना शिरूर येथील खादगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु त्यांचाही तेथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ट्रक ( एम. एच. १७ ओ. जी. ९२५९) पोलिसांनी ताब्यात घेतला असून, अपघाती वाहने टाकळी हाजी चौकीला आणून लावलेली आहेत. सदरचा अपघात सकाळी ८.४५ वा. च्या सुमारास झाला आहे. या घटनेबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास टाकळी हाजी औटपोस्टचे पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले करीत आहेत.
टाकळी हाजी गावातच पोलीस चौकी असून, या चौकीत अपघात झाला तेव्हा कोणीच पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हते . अपघात झाल्यावर एक तासाने पोलीस घटनास्थळी दाखल झाले . गावात पोलीस चौकी म्हणजे शोभेचे बाहुले झाले असून , चोरी, दरोडा खून या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत मात्र लोकाना तत्काळ मदत मिळत नाही . टाकळी हाजी पोलीस स्टेशन कधी मंजूर होणार, असा प्रश्न जनतेमधून विचारला जात आहे .