पावसाच्या साचलेल्या पाण्यात पडून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 05:44 PM2022-08-12T17:44:09+5:302022-08-12T17:44:37+5:30
गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पावसाने लोहगाव-वाघोली रस्ता येथील कर्मभुमी येथे रस्त्याला तळ्याचे स्वरूप
चंदननगर : पुण्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पावसाने लोहगाव-वाघोली रस्ता येथील कर्मभुमी येथे रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले होते. या साचलेल्या पाण्याने तरूणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सयाजी वाघमारे (वय 25, रा. सुभाष काळभोर यांचे भाडेकरी, दत्त मंदिरासमोर, लोहगाव) असे या तरुणाचे नाव आहे.
गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास सयाजी वाघमारे हे दुचाकी वरून घरी जातं असताना कर्मभूमी येथील रस्त्यावर पावसाने साचलेल्या पाण्यात पडले. त्यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि त्यांच्या नाका, तोंडात पाणी गेले. आजूबाजूच्या दुकानदारांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु तोपर्यंत डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे घोषीत केले. याबाबत विमानतळ पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाघमारे हे मूळचे सोलापूर येथील असून ते काळभोर यांच्या घरी भाड्याने राहत होते. ते डम्पर चालवायचे काम करत होते.
साचलेल्या पाण्यातच 15 ऑगस्ट रोजी झेंडा वंदन करणार
हि घटना गंभीर असून आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार? असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत. गेल्या आठ दिवसापासून या भागात पाणी साचून आहे. दुचाकी, कार देखील पाण्यात घातल्यानंतर बंद पडत आहेत. नागरिक अक्षरशः पाण्यात पडत आहेत. सणासुदीचे दिवस असताना मुख्य रस्त्यावरून ये-जा करत करताना नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. नेहमीच्या या समस्येला सर्व नागरिक वैतागले असून जर महापालिकेने लक्ष दिले नाही. तर साचलेल्या पाण्यातच 15 ऑगस्ट रोजी झेंडा वंदन करण्याचा इशारा लोहगाव - वाघोली नागरिक विकास मंचने दिला आहे.