दोन मैत्रिणींचा दुर्दैवी मृत्यू; मार्निंग वाॅकला जाताना वाहनाने चिरडले, बारामती-इंदापूर महामार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 04:04 PM2023-02-22T16:04:06+5:302023-02-22T16:04:16+5:30
दोघींच्या मृत्यूमुळे आनंदनगर -जंक्शन परिसरावर शोककळा पसरली
लासुर्णे : जंक्शन (ता.इंदापूर) येथे पोलिस ठाण्यापासुन हाकेच्या अंतरावर बारामती-इंदापूर पालखी महामार्गावर मार्निंगवॉक साठी गेलेल्या दोन महिलांना अज्ञात वाहनांनी धडक देवून चिरडल्याने दोघींचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातामध्ये अर्चना श्रीशैल सनमठ व अनिता शिवाजी शिंदे (रा.दोघी, आनंदनगर) यांचा मृत्यू झाला.
जंक्शन,आनंदनगरमधील मधील अनेक नागरिक सकाळी मार्निंग वाॅक साठी बारामती-इंदापूर व जंक्शन - वालचंदनगर रस्त्याने फिरत असतात. तसेच अनेक जण नीरा डाव्या कालव्याच्या ४६ क्रमांकाच्या वितरिकेने ही जात असतात. सध्या बारामती ते इंदापूर दरम्यानच्या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम वेगाने सुरु आहे. जंक्शन चौकामध्ये ही काम सुरु असून काम करणारी अवजड वाहनेही भरधाव वेगाने रस्त्याने ये -जा करीत आहेत. आज बुधवार (ता.२२) रोजी सकाळी सात च्या सुमारास अर्चना सनमठ व अनिता शिंदे (रा.दोघी, आनंदनगर) पोलिस ठाण्याजवळून बारामती-इंदापूर राज्यमार्गाच्या सर्व्हिस रोडने मार्निंग वॉक करीत होत्या. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या अजवड वाहनाने पाठीमागून ठोस दिल्याने अर्चना सनमठ यांचा जागीच मृत्यू झाला. तर अनिता शिंदे जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर दवाखान्यामध्ये उपचार सुरु असतान मृत्यू झाला. अपघातानंतर वालचंदगर पोलिसांनी ताताडीने अवजड वाहनांचा शोध घेण्याचे काम सुरु केले होते. अधिक तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे करीत आहेत.
दोघी मैत्रींनीचा दुर्देवी अंत...
अर्चना सनमठ व अनिता शिंदे या दोघी मैत्रीण होत्या. दररोज नियमित माॅर्निंग वॉक साठी फिरायला जात होत्या. त्यांच्याबरोबर त्यांची दररोज एक मैत्रीण असायची. मात्र आज ती गेली नव्हती. दोघींच्या मृत्यूमुळे आनंदनगर -जंक्शन परिसरावर शोककळा पसरली आहे.