मामाच्या गावाला आलेल्या सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत, शेततळ्यात बुडून मृत्यू; पुणे जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 02:27 PM2024-05-23T14:27:40+5:302024-05-23T14:29:46+5:30
ही घटना समजाताच पाबळ व राहू येथे शोककळा पसरली. पुढील तपास शिक्रापूर पोलिस करत आहेत....
शिक्रापूर (पुणे) : पाबळ (ता. शिरूर) येथे मामाच्या गावाला आलेल्या दोन शाळकरी सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.२२) दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास घडली. आर्यन संतोष नवले (वय १३) व आयुष संतोष नवले (वय १०, दोघे, रा. राहू, ता. दौंड), अशी मृत्युमुखी पडलेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, आर्यन व आयुष हे दोघे मंगळवारी (दि.२१) पाबळ येथील मामा सचिन भाऊसाहेब जाधव यांच्याकडे सुटी लागल्याने आले होते. आज दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास हे दोघे घराशेजारी असलेल्या भाऊसाहेब बापू जाधव यांच्या शेततळ्याजवळ खेळत खेळत गेले. दोघांनी कपडे काढून शेततळ्यात उडी मारली; परंतु पोहता येत नसल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही शेततळ्यात बुडाले.
शेजारीच शेळ्या चारत असलेले त्यांचे आजोबा बाळासाहेब जाधव यांनी घटना पाहिल्यावर मदतीसाठी आवाज दिला. कैलास अण्णाजी जाधव यांनी दोघांना पाण्याबाहेर काढले; परंतु दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. ही घटना समजाताच पाबळ व राहू येथे शोककळा पसरली. पुढील तपास शिक्रापूर पोलिस करत आहेत.