रायगडचा अपरिचित इतिहास उलगडणार
By श्रीकिशन काळे | Updated: March 17, 2025 10:09 IST2025-03-17T10:09:23+5:302025-03-17T10:09:56+5:30
रायगडचा मोडी कागदपत्रांमधील अपरिचित इतिहास ‘महाराजांचा रायगड’ या पुस्तकाच्या माध्यमातून उलगडणार आहे. हे पुस्तक एप्रिल महिन्यात वाचकांच्या भेटीस येत आहे.

रायगडचा अपरिचित इतिहास उलगडणार
पुणे : स्वराज्याची राजधानी असलेला रायगड शिवकाळात कसा होता, तो दिसायचा कसा? त्याविषयीचे गुपित मोडी लिपीमध्येच दडलेले होते; पण आता हजारो मोडी लिपीच्या कागदपत्रांमधून त्यावेळचा रायगड प्रत्यक्षात कसा होता, ते थ्रीडीमधून शिवप्रेमींना अनुभवता येणार आहे, तसेच रायगडाचा इतिहास पुस्तक रूपातून देखील समोर येईल.
रायगडचा मोडी कागदपत्रांमधील अपरिचित इतिहास ‘महाराजांचा रायगड’ या पुस्तकाच्या माध्यमातून उलगडणार आहे. हे पुस्तक एप्रिल महिन्यात वाचकांच्या भेटीस येत आहे. पुणे पुरालेखागारातील रायगडच्या हजारो मोडी कागदपत्रांचा अभ्यास करून इतिहास संशोधक व मोडी लिपीतज्ज्ञ राज चंद्रकांत मेमाणे हे पुस्तक वाचकांच्या समोर घेऊन येत आहेत.
याविषयी दुर्ग अभ्यासक-इतिहास संशोधक राज मेमाणे म्हणाले की, इसवी सन १७७३ ते १८१८ या कालावधीत पेशव्यांकडे रायगडचा कारभार होता. या कालावधीतील मोडी कागदपत्रांवर आधारित हे पुस्तक आहे. यातील काही कागदपत्रांवर आधारित संशोधन यापूर्वी प्रकाशित झालेले आहे; परंतु ते अपूर्ण असून, महाराजांचा रायगड या पुस्तकात पूर्ण होणार आहे. त्यातून रायगडच्या अनेक अपरिचित पैलूंवर प्रकाश पडणार आहे. रायगड येथील शिवकालीन वास्तू जसे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा, महाराजांची तख्ताची सदर, विवेकसभा, कोठार आदी इमारतींचे बांधकाम कसे होते, त्यांची दुरुस्ती व बांधकाम कसे केले जात असे, आदींचे वर्णन कागदपत्रांमधून सापडते.
थ्रीडी आराखडा
मोडी कागदपत्रांतून किल्ले रायगडवरील बांधकामाच्या वर्णनावरून तसेच वापरलेल्या वस्तू यावरून त्रिमितीय (थ्रीडी) आराखडा दुर्ग अभ्यासक इतिहास संशोधक प्रसाद दांगट पाटील हे बनवत आहेत.
भविष्यात रायगडवरील इमारतींचे पुनर्निर्माण झाल्यास या मोडी कागदातील माहितीचा आणि त्रिमितीय आराखड्याची मोठी मदत होणार आहे.
वाडेश्वर मंदिराच्या बांधकामाला १७०० कौले
कुशावर्त तलावावरील वाडेश्वर मंदिराच्या बांधकामाला तेव्हा १७०० कौले लागली होती. त्याचप्रमाणे रायगडावर वास्तू, दरवाजे, बुरूज, पहारे आदी कोठे होते? याची माहिती या कागदपत्रांमधून समोर आली आहे.