कंपनीच्या हलगर्जीपणाने चिमुकलीचा बळी! पाण्याच्या हौदात पडून २ वर्षाच्या मुलीने गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 03:12 PM2023-01-02T15:12:10+5:302023-01-02T15:31:54+5:30
कंपनीने शेजारीच पाण्याचा हौद बांधला असून त्याठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नव्हती
पुणे : जांभुळवाडी येथील सिमेंट पाईप बनविणाऱ्या कारखान्यातील पाण्याच्या हौदात पडून एका २ वर्षाच्या मुलीचा मृत्यु झाला. याप्रकरणी विमलकुमार शिवशंकरलाल गौतम (वय २६, रा. जांभुळवाडी) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अश्रफ अली खान (रा. वारजे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना जांभुळवाडी येथील दरी पुलाजवळील एके आर सीसी कंपनीत ३१ डिसेबर रोजी दुपारी १२ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरी पुलाजवळ एके आर सीसी ही सिमेंट पाईप बनविणारी कंपनी आहे. पाईप बनविल्यानंतर ते भिजविण्यासाठी जमिनीलगत पाण्याचा मोठा हौद बनविण्यात आला आहे. या पाण्याचा हौदात कोणी जाऊ नये, म्हणून कोणतीही सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे कारखान्याच्या आवारात राहणारे फिर्यादी यांची मुलगी सुरभी (वय २) ही या पाण्याच्या हौदात पडली. हे पाहिल्यानंतर तिला तातडीने बाहेर काढण्यात आले. तिला रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला. सहायक पोलीस निरीक्षक धामणे तपास करीत आहेत.