आगीतील बाधितांची आता आश्वासनांनी पुन्हा होरपळ; पाच पैशांचीही मदत नाही
By राजू इनामदार | Published: December 21, 2023 06:08 PM2023-12-21T18:08:17+5:302023-12-21T18:10:44+5:30
टिंबर मार्केटमध्ये लागलेल्या आगीत १२ कुटुंबे व ७ व्यावसायिकांचे बरेच मोठे आर्थिक नुकसान झालेच, पण त्यानंतर आता आश्वासनांच्या आगीतही त्यांची होरपळच होते
पुणे: टिंबर मार्केटमध्ये २५ मे २०२३ च्या रात्री लागलेल्या आगीत बाधीत कुटुंबे व व्यावसायिकांना सरकारकडून वारेमाप आश्वासने मिळाली, मदत मात्र एका पैशाचीही अद्याप मिळालेले नाही. त्या नैसर्गिक आगीत १२ कुटुंबे व ७ व्यावसायिकांचे बरेच मोठे आर्थिक नुकसान झालेच, पण त्यानंतर आता आश्वासनांच्या आगीतही त्यांची होरपळच होते आहे.
भवानी पेठेतील टिंबर मार्केट ( लाकूड बाजार) मध्ये वारंवार आग लागत असते. या मार्केटला लागूनच रहिवासी घरे आहेत. हा सर्व परिसर बराच जुना आहे. २५ मे ला अशीच आग लागली. त्यामध्ये ७ दुकानदार व १२ कुटुंबांच्या घराचे बरेच नुकसान झाले. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही, मात्र आर्थिक नुकसान झाले. अशी आग लागल्यानंतर लगेचच तिथे अधिकारी, पदाधिकारी यांच्या भेटीगाठी सुरू होतात, सांत्वन केले जाते व मुख्य म्हणजे बरीच आश्वासने दिली जातात.
या आगीनंतरही तेच झाले असे तेथील एक बाधित चेतन अगरवाल यांनी सांगितले. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह बऱ्याच राजकीय व्यक्तींनी भेट दिली. जिल्हाधिकारीही आले. तिथेच बाधितांना त्वरीत मदत करण्याचा निर्णय झाला. अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये नुकसान झालेल्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तातडीची मदत करण्याचा कायदा आहे. त्यानंतर पंचनामा वगैरे करून नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली जाते व त्याप्रमाणे मंत्रीमंडळाकडे प्रस्ताव पाठवून मंजूरी घेत आर्थिक मदत केली जाते.
या आगीत तहसील स्तरावर पंचनामे झाले आहेत. भेटीदरम्यान मंत्री व प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही त्वरीत मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता ६ महिने होत आले तरीही सरकारदरबारी यावर काहीच हालचाल नाही. स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांनी हात वर केले आहेत. त्यामुळे सर्व बाधित संतापले असून आता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढूनच मागणी करण्यात येईल असे अगरवाल यांनी सांगितले ती वेळ येऊ द्यायचे नसेल तर तातडीने मदत केली जावी अशी बाधितांची मागणी असल्याचे अगरवाल म्हणाले.