माणुसकीचे दर्शन! गणेश विसर्जनाच्या गर्दीत पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले १३ वर्षीय मुलाचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 07:21 PM2022-09-09T19:21:22+5:302022-09-09T19:25:14+5:30

‘खाकी'त असलेल्या माणुसकीचे जेव्हा दर्शन घडतं....

The vision of humanity! Thirteen-year-old boy's life was saved due to promptness of police during Ganesh immersion | माणुसकीचे दर्शन! गणेश विसर्जनाच्या गर्दीत पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले १३ वर्षीय मुलाचे प्राण

माणुसकीचे दर्शन! गणेश विसर्जनाच्या गर्दीत पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले १३ वर्षीय मुलाचे प्राण

googlenewsNext

- कल्याणराव आवताडे 
धायरी (पुणे):  कडक शिस्त, भारदस्त आवाज,रागीट स्वभाव आणि खाकीचा धाक अशी पोलिसांची ओळख असते परंतु या ‘खाकी'त असलेल्या माणुसकीचे जेव्हा दर्शन घडतं तेव्हा त्याला सलाम केल्याखेरीज राहता येत नाही. कडक शिस्तीच्या खाकी वर्दीच्या पलीकडे देखील ' माणुसकी ' असते हे पुण्यातील डेक्कन येथील खंडोजी बाबा चौक परिसरात गणेश विसर्जन बंदोबस्तासाठी असलेले उत्तमनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी संदीप सांगळे यांचे कार्य पाहून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 

वारजे भागातील गोकुळ नगर परिसरात वसंत साठे हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. घरासमोर मोकळे पटांगण आहे. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मोकळ्या पटांगणत असणाऱ्या गवतामधून चालताना त्यांचा १३ वर्षीय मुलगा आर्यन याच्या अंगठ्याला सापाने चावा घेतला.

सर्पदंश झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला दुचाकीवर बसवून खंडोजी बाबा चौकापर्यंत आणले. मात्र त्यांना गर्दीतून पुढे जाता येईना, शिवाय काही रस्तेही वाहतुकीसाठी बंद होते. त्यामुळे तिथे बंदोबस्तासाठी असणारे उत्तमनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अर्जुन बोत्रे, पोलीस कर्मचारी संदीप सांगळे व कोथरूड वाहतूक विभागाचे पोलिस कर्मचारी समीर बागशिराज यांना वसंत साठे यांनी मदतीसाठी विनंती केली. सर्पदंश झालेला आर्यन बेशुद्ध अवस्थेत चालल्याचे लक्षात आल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे यांनी पोलीस कर्मचारी संदीप सांगळे यांना आर्यनला तत्काळ पोलिस वाहनातून ससून रुग्णालयात घेऊन जाण्याबाबत सांगितले.

पोलीस कर्मचारी संदीप सांगळे यांनी गर्दीतून सायरन वाजवत वाहतुकीसाठी बंद असलेल्या रस्त्यावरील बॅरिकेट काढत पोलीस वाहनातून आर्यनला तात्काळ ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी वसंत साठे यांनी पोलिसांचे आभार मानले. सध्या त्याची प्रकृती व्यवस्थित असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले आहे.

Web Title: The vision of humanity! Thirteen-year-old boy's life was saved due to promptness of police during Ganesh immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.